पहिल्या यादीनंतर मिळणार अर्ज पडताळणीची संधी
By admin | Published: July 1, 2017 03:07 AM2017-07-01T03:07:13+5:302017-07-01T03:07:13+5:30
अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत गुरुवारी सायंकाळी ५ वाजता संपली. मात्र, तोपर्यंत हजारो विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली नव्हती.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अकरावी आॅनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत गुरुवारी सायंकाळी ५ वाजता संपली. मात्र, तोपर्यंत हजारो विद्यार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली नव्हती. त्यामुळे आपण प्रवेश प्रक्रियेच्या बाहेर पडलो, असे वाटल्याने विद्यार्थी तणावाखाली आले, पण पहिल्या यादीनंतर पुन्हा अर्ज पडताळणीची संधी देण्यात येणार असल्याचे शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
अकरावी प्रवेशात पारदर्शकता यावी, म्हणून आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी पहिला अर्ज भरला, तेव्हा त्यांना कोणत्याही अडचणी आल्या नाहीत, पण अर्ज २ भरायला सुरुवात केल्यावर, अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. आॅनलाइन प्रक्रियेत गोंधळ झाल्याने, दोन दिवस अर्ज भरण्याची मुदत वाढवून दिली होती. त्यानुसार, गुरुवार, दि. २९ जूनला सायंकाळी ५ वाजता अर्ज भरण्याची मुदत संपली. या वेळी पहिला अर्जाची ५ हजार ७२२ विद्यार्थ्यांची पडताळणी पूर्ण झालेली नव्हती, तर अर्ज २ ची १ हजार २६७ विद्यार्थ्यांची पडताळणी पूर्ण झालेली नव्हती.
अर्ज पडताळणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांचे अर्ज भरून पूर्ण होत नाहीत. त्यामुळे हे हजारो विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर पडले आहेत, पण हे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेबाहेर पडले नसल्याचे शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी स्पष्ट केले. पहिल्या यादीत या विद्यार्थ्यांची नावे लागणार नाहीत, पण त्यानंतर, विद्यार्थ्यांना पुन्हा अर्जात बदल करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्या वेळी हे विद्यार्थी अर्ज पडताळणी पूर्ण करू शकतील, असे चव्हाण यांनी सांगितले.