कामाच्या वेळा बदलण्यास विरोध
By admin | Published: January 10, 2015 02:24 AM2015-01-10T02:24:03+5:302015-01-10T02:24:03+5:30
मुंबईतील कार्यालयीन कामकाजाच्या वेळा बदलण्याची रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची सूचना हास्यास्पद असल्याचे सांगत त्यास कडाडून विरोध केला आहे.
प्रभूंच्या सूचनेवर टीका : अनेक संघटनांनी उडवली खिल्ली
संदीप प्रधान - मुंबई
मुंबईतील कार्यालयीन कामकाजाच्या वेळा बदलण्याची रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची सूचना हास्यास्पद असल्याचे सांगत राज्य सरकार, महापालिका कामगार व कर्मचारी, बँकामधील कर्मचारी, औद्योगिक कामगार अशा सर्वांनी त्यास कडाडून विरोध केला आहे. रेल्वेचे अपयश झाकण्याकरिता अशा सूचना करण्याऐवजी रेल्वेसेवेत सुधारणा करावी, असा सल्लाही या संघटनांनी प्रभू यांना दिला आहे.
मुंबईतील उपनगरी रेल्वे प्रवासात सकाळी व संध्याकाळी होणारी प्रवाशांची गर्दी टाळण्याकरिता कार्यालयीन कामकाजाच्या वेळा बदलण्याची सूचना रेल्वेमंत्री प्रभू यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यास अनुकूलता दाखवली आहे. मात्र, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष योगिराज खोंडे म्हणाले की, सरकारने अजून अशा कुठल्याही प्रस्तावावर आमच्याशी चर्चा केलेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी परस्पर असा निर्णय जाहीर करणे योग्य होणार नाही. सरकारमधील एका खात्याचा दुसऱ्या खात्याशी वरचेवर संबंध येत असतो. त्यामुळे खात्यांकरिता किंवा त्या खात्यांमधील कर्मचाऱ्यांकरिता वेगवेगळ््या कामाच्या वेळा ठरवता येऊ शकत नाही.
मुंबई महापालिका कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या म्युनिसिपल मजदूर युनियनचे सरचिटणीस महाबळ शेट्टी यांनी रेल्वे मंत्र्यांची ही सूचना अव्यवहार्य असल्याचे मत व्यक्त केले. महापालिका कामगारांना विश्वासात न घेता हा निर्णय लादला तर आंदोलन करण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला. महापालिका कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस प्रकाश देवदास म्हणाले की, लोकांना मिळणारी सेवा या निर्णयाने प्रभावित होते किंवा कसे याचा सखोल अभ्यास केल्याखेरीज हा निर्णय लागू करता येणार नाही. रेल्वेच्या कारभारात सुधारणा करण्यास प्राधान्य दिले पाहिजे.
आॅल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विश्वास उटगी म्हणाले की, रेल्वेमंत्री प्रभू यांची सूचना हास्यास्पद आहे. उपनगरात बँका सकाळी लवकर काम सुरु करतात तर कफ परेड भागात दहा वाजल्यानंतर काम सुरु करतात. सरकारी कर्मचारी तसेच वेगवेगळी मार्केट यांच्या कामाच्या वेळा गेल्या ४० वर्षांत कामगार, कर्मचाऱ्यांच्या सोयीनुसार निश्चित केलेल्या आहेत. परंतु उपनगरातील वाढती लोकसंख्या आणि रेल्वे सेवेतील त्रुटी यामुळे प्रवाशांचे हाल होतात. रेल्वेतील कमतरतांवर उपाय करायचे सोडून लोकांनी रेल्वेशी अॅडजेस्ट करण्याची प्रभू यांची सूचना रेल्वेच्या अपयशावर पांघरूण घालणारी आहे.
आयटी कर्मचाऱ्यांवरील ताण कमी होईल
च्प्रभू यांच्या सूचनेचे केवळ बीपीओ, आयटी एम्प्लॉईज कॉन्फेडरेशनचे अध्यक्ष अजित सावंत यांनी स्वागत केले. ते म्हणाले की, कॉलसेंटर व बीपीओमधील कर्मचारी वेगवेगळ्या वेळी काम करतात.
च्आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण असतो. कामाच्या वेळा बदलल्या तर त्यांच्यावरील ताण कमी होईल. त्यामुळे आम्ही या सूचनेचे स्वागत करतो.
रेल्वेमंत्री प्रभू यांची कल्पनेची भरारी
औद्योगिक कामगारांचे नेतृत्व करणाऱ्या कामगार आघाडीचे नेते दादा सामंत म्हणाले की, सामान्य जनतेचा संबंध येणारी कार्यालये वेगवेगळ्या वेळांत चालवण्याची प्रभू यांची सूचना म्हणजे कल्पनेची भरारी आहे. औद्योगिक कामगार वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतो. बृहन्मुंबईतील सफेद कॉलर कर्मचारी ही सूचना कदापि स्वीकारणार नाही. रेल्वेचे इन्फ्रास्ट्रक्चर न सुधारता केलेली सूचना म्हणजे रेल्वेमंत्र्यांनी शोधलेली पळवाट आहे.
महाराष्ट्रासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळ
आगामी बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची तरतूद करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ठाण्यातील एका कार्यक्रमात केले.