आरोपींच्या चौकशीची संधीच मिळेना!
By admin | Published: December 22, 2015 02:35 AM2015-12-22T02:35:19+5:302015-12-22T02:35:19+5:30
कांदिवलीतील दुहेरी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची चौकशी करण्याची संधी दिली जात नसल्याची तक्रार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.
मुंबई : कांदिवलीतील दुहेरी हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार आरोपींची चौकशी करण्याची संधी दिली जात नसल्याची तक्रार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. गळेकापू स्पर्धेमुळे चौकशीत अडथळे येत असल्याने फरार विद्याधरला अटक करण्यात दिरंगाई होईल, असेही या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या प्रकरणी गुन्हे शाखा समांतर चौकशी करीत आहे.
हेमा उपाध्याय आणि हरिश भांबानी यांच्या हत्येप्रकरणी कांदिवली पोलिसांनी विजय, प्रदीप, आझाद आणि साधू राजभर या चौघांना अटक केली आहे; परंतु, आम्हाला या चौघांची चौकशी करण्याची संधी दिली जात नाही. ती संधी मिळाल्यास आम्ही या हत्येचे नवे धागेदोरे शोधू शकतो. त्यातून चौकशीला पूरक दिशा मिळेल, असे गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. काही ठरावीक मुद्द्यांवर आम्हाला या चार आरोपींची चौकशी करायची आहे. या दुहेरी हत्येचा छडा स्थानिक पोलिसांनी लावला आहे. आम्ही या प्रकरणात एखाद्याला अटक केली तरी त्या आरोपीला स्थानिक पोलिसांच्याच हवाली करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)