मंत्रिपदावर नव्या चेहऱ्यांना संधी
By admin | Published: April 7, 2017 06:05 AM2017-04-07T06:05:10+5:302017-04-07T06:05:10+5:30
राज्य मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या काही मंत्र्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल
यदु जोशी,
मुंबई- राज्य मंत्रिमंडळातील शिवसेनेच्या काही मंत्र्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल. पण हा बदल कधी आणि कसा करायचा हे मी ठरवेन, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेनेच्या आमदारांना आश्वस्त केले.
सध्या शिवसेनेच्या काही मंत्र्यांबाबत आमदारांमध्ये प्रचंड खदखद आहे. यासंदर्भात पक्षप्रमुख उद्धव यांनी मंत्री व आमदारांची गुरुवारी सांयकाळी मातोश्रीवर बैठक बोलविली होती.
सूत्रांनी सांगितले की, यावेळी आमदारांनी विधान परिषदेचे सदस्य असलेल्या चारही कॅबिनेट मंत्र्यांविरुद्ध तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. हे मंत्री आम्हाला विश्वासात घेत नाहीत, आमची कामे करीत नाहीत, सौजन्याने बोलतदेखील नाहीत. उलट आम्हालाच जाब विचारला जातो, अशा तक्रारींचा पाढा आमदारांनी बैठकीत वाचला.
आमदारांच्या संतप्त भावना शांतपणे ऐकूण घेतल्यानंतर उद्धव यांनी आमदारांना आश्वस्त केले. ते म्हणाले, तुमच्या नाराजीची मला जाणीव आहे. बदल करायचेच आहेत, पण आज घाईघाईने बदल केला आणि पुढेही तक्रारी आल्या तर बदलांना अर्थ राहणार नाही. त्यामुळे कोणाला संधी द्यायची याचा नीट विचार मला करू द्या, असेही ठाकरे यांनी सांगितल्याचे समजते.
शिवसेनेच्या मंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करताना, मंत्री बदलण्याचे सर्वाधिकार आपलेच असून आपण घ्याल तो निर्णय आम्हाला मान्य असेल, अशा
भावना व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
>मंत्र्यांचे मुखदर्शनही नको!
उद्धव ठाकरे आधी फक्त आमदारांशी बोलले. तोवर त्यांनी मंत्र्यांना आतील खोलीत बसवून ठेवले होते. थोड्या वेळाने उद्धव आमदारांना म्हणाले की, मी आता मंत्र्यांना समोर आणतो. यावर आम्हाला मंत्र्यांशी बोलायचेच नाही, अशी भूमिका आमदारांनी घेतली. पण त्यांची समजूत काढत उद्धव यांनी मंत्र्यांना त्यांच्यासमोर आणले खरे, पण एकानेही मंत्र्यांना ‘जय महाराष्ट्र’ केला नाही!
>ज्येष्ठ मंत्र्यांवर हल्लाबोल
शिवसेनेच्या आमदारांना विकास कामांसाठी निधी मिळावा म्हणून पक्षाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे कशी आग्रही मागणी केली या बाबत सांगण्याचा प्रयत्न एका ज्येष्ठ मंत्र्यांनी केला. त्यावर विकासाचा निधी मिळायचा तो नियमानुसार मिळतोच, आमची नाराजी काय आहे ते आम्ही उद्धवजींना सांगितले आहे, असे एका आमदाराने त्यांना सुनावले.
>योगींचा सल्ला नको
शिवसेनेचे मंत्री कधी बदलायचे त्याचा निर्णय मी नक्कीच घेईन. त्यासाठी मी सक्षम आहे. मला योगी आदित्यनाथांच्या सल्ल्याची, वा कुणाचा पॅटर्न समजून घेण्याची गरज नाही, असा चिमटा उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काढला. शेतकरी कर्जमाफीबाबत उत्तर प्रदेश पॅटर्नचा अभ्यास केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी बुधवारी म्हटले होते.
>शिवसेनेच्या आमदारांना कमी निधी मिळतो अशी तक्रार आहे. आमच्या आमदारांना भाजपाइतकाच समान निधी मिळावा यासाठी पक्षाची एक समिती शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेईल. या समितीमध्ये शिवसेनेचे ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येकी दोन आमदार, गटनेते आणि मंत्र्यांचा समावेश आहे. मंत्र्यांच्या कामगिरीबाबत शिवसेनेचे आमदार नाराज असल्याच्या वृत्तात तथ्य नाही.
- रामदास कदम,पर्यावरण मंत्री