बुधाचे अधिक्रमण पाहण्याची संधी हुकली
By admin | Published: May 10, 2016 12:55 AM2016-05-10T00:55:14+5:302016-05-10T00:55:14+5:30
शतकामध्ये काही वेळा होणारी सूर्यावरील बुधाचे अधिक्रमण पाहण्याची पुणेकरांची संधी हुकली. पुण्यामध्ये नेमके सायंकाळी ढगाळ हवामान असल्याने खगोलप्रेमींनी तयारी करूनही हे दृश्य अनुभवता आले नाही
पुणे : शतकामध्ये काही वेळा होणारी सूर्यावरील बुधाचे अधिक्रमण पाहण्याची पुणेकरांची संधी हुकली. पुण्यामध्ये नेमके सायंकाळी ढगाळ हवामान असल्याने खगोलप्रेमींनी तयारी करूनही हे दृश्य अनुभवता आले नाही.
महात्मा गांधी मिशनच्या खगोलशास्त्र व अंतराळ तंत्रज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर म्हणाले, ‘‘या अभूतपूर्व घटनेवेळी काढण्यात आलेल्या छायाचित्रांचा फायदा जगभरातील शास्त्रज्ञांना सूर्याचा व्यास मोजण्यासाठी होणार आहे.’’
बुधाचे अधिक्रमण सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी पार पडले. सूर्यबिंबावरून बुध सरकताना पाहण्याची अनोखी संधी होती. नागपूर, इचलकरंजी, नांदेड येथील विज्ञानप्रेमींना मात्र हा अनुभव घेता आला.
सूर्यमालेतील सूर्याला सर्वात जवळ असणारा बुध ग्रह सूर्यबिंबावरून सरकण्याला अधिक्रमण म्हणतात. राज्यातील खगोलप्रेमींनी छोट्या दुर्बिणीला सोलर फिल्टर लावून, दुर्बिणीचा वापर करून, तर काही जणांनी आरशाद्वारे भिंतीवर सूर्याची प्रतिमा परावर्तित करून सूर्यबिंब पाहिले.
एका शतकामध्ये १३ ते १४ वेळेस ही घटना होते. यापूर्वी ८ नोव्हेंबर २००६ ला हे पाहता आले होते. यानंतर ११ नोव्हेंबर २०१९ व १३ नोव्हेंबर २०३२ मध्ये हे दिसणार आहे. पृथ्वी व सूर्य यांच्यादरम्यान बुध व शुक्र हे दोन ग्रह आहेत. शुक्राचे अधिक्रमण फारच दुर्मिळ असते. शतकातून केवळ दोन वेळा ही घटना प्पाहता येते. आठ जून २०१४ व १२ जून २०१२ रोजी शुक्राचे अधिक्रमण पाहता आले होते. यानंतर २११७ व २११५ मध्ये पाहता येणार आहे.
साडेसात तास होणारे बुध ग्रहाचे अधिक्रमण जागतिक वेळेनुसार ११ वाजुन १२ मिनिटांनी (भारतीय वेळेनुसार दुपारी ४ वाजून ४२ मि.) पार पडले. या वेळी बुध ग्रहाच्या कडेने सूर्यबिंबाला स्पर्श करण्यास सुरुवात केली. यानंंतर केवळ ३ मिनिटे १२ सेकंदानंतर संपूर्ण बुध ग्रह सूर्यबिंबावर दिसण्यास सुरुवात झाली. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ५.५० मिनिटांनी ही घटना पाहता आली. या वेळी बुध ग्रह सूर्यबिंबाच्या जवळपास मध्यापर्यंत गेला.