२४ जानेवारीला ‘बुद्धिस्ट’ची शाखा घेण्याची संधी
By admin | Published: January 22, 2016 03:36 AM2016-01-22T03:36:13+5:302016-01-22T03:36:13+5:30
औरंगाबाद तालुक्यातील चौका येथील बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने राज्यभर शाखा देण्यात येत असून, यासाठी २४ जानेवारी रोजी शाखा देणे व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
चौका : औरंगाबाद तालुक्यातील चौका येथील बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने राज्यभर शाखा देण्यात येत असून, यासाठी २४ जानेवारी रोजी शाखा देणे व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल गेल्या दहा वर्षांपासून बौद्ध धम्मीयांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार उभा करण्यासाठी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी शाखा उभारल्या जात आहेत. आतापर्यंत २३० शाखा कार्यरत असून, याचे जाळे राज्यभर निर्माण करण्यासाठी आणखी २७० शाखा देण्यात येणार आहेत.
आज कोणत्याही ठिकाणी प्राथमिक शाळा उघडायची असेल, तर जिल्हा परिषदेमार्फत शिक्षण हक्क कायदा २००९ नुसार स्वयंअर्थसाहाय्य प्रस्ताव दाखल करून शाळा मिळवावी लागते. सदरील पद्धत खर्चिक व किचकट असून ती सर्वसामान्य बौद्ध धम्मीयांना परवडणारी नाही, हे लक्षात घेऊन दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलने भारतीय घटनेच्या आर्टिकल ३० (१) अंतर्गत अल्पसंख्याकांना धार्मिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था काढण्याचा जो मूलभूत अधिकार आहे त्याअंतर्गत भारतातील पहिली शासन मान्यताप्राप्त बौद्ध धम्मीय शैक्षणिक संस्था काढण्यात आली असल्याचे ढाले यांनी सांगितले.
यामार्फत प्रत्येक तालुक्यात बुद्धिस्ट पॅटर्न व सीबीएसई पॅटर्नची सांगड घालून बाबासाहेबांना अभिप्रेत असा बुद्धिस्ट अनुयायी घडविण्याचे काम चालू असल्याचेही ते म्हणाले.
२३० शाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. १२ वी उत्तीर्ण ते बी.एड., डी.एड, पदवीधारकांसाठी शिक्षकांची पदेही भरण्यात येत आहेत, तसेच बुद्धिस्ट शॉपीज, बुद्धिस्ट कॉलनीज, बुद्धिस्ट इंटरप्राईजेसद्वारेही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. या संधी समजून घेण्यासाठी बुद्धिस्ट युवकांसाठी शिबीर आयोजित केले आहे.