बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून सुरेश प्रभु यांच्याकडून रेल्वे खाते काढून घेतले - पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 11:03 AM2017-09-25T11:03:10+5:302017-09-25T14:09:14+5:30
केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून त्यांच्याकडून रेल्वे मंत्रालय काढून घेण्यात आले असा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
नागपूर - केंद्रीय मंत्री सुरेश प्रभु यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून त्यांच्याकडून रेल्वे मंत्रालय काढून घेण्यात आले असा आरोप महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. नागपूरमध्ये निवडक संपादकांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हे विधान केले.
काँग्रेस रस्त्यावरील लढाईत कमी पडत असल्याचेही त्यांनी मान्य केले. भाजपाची पितृ संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघही मोदी यांच्या कार्यशैलीवर नाराज असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
नोटाबंदीमुळे भारताची अर्थव्यवस्था खिळखिळी झाली आहे. यामागे अमेरिकेचा हात होता व भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठीच हे षडयंत्र रचण्यात आले. काही उच्चपदस्थ अधिका-यांच्या बोलण्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी फसले आणि त्याचा फटका आता संपूर्ण देश भोगत आहे, असा आरोपही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. नागपुरात सोमवारी त्यांनी वृत्तपत्रांच्या संपादकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध बाबींवर आपले मत प्रकट केले.
नरेंद्र मोदींना अर्थशास्त्राचे ज्ञान नाही. नोटाबंदीनंतर पैसे मोजण्यास मोठा कालावधी लागला. नोटाबंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात काळा पैसा पांढरा झाला. यात प्रचंड आर्थिक भ्रष्टाचार झाला, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला.
देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी ज्यावेळी विदेशात जातात तेव्हा येथील गोष्टींचे ‘मार्केटिंग’ त्यांनी करणे अपेक्षित आहे. मात्र ते तेथे विक्रेते म्हणून न जाता खरेदीदार बनून जातात. सोबतच चेकबुक घेऊन जातात. अशा पद्धतीने परदेशात मोठमोठे करार होत असतील तर कुठलाही देश त्यांचे ‘रेड कार्पेट’ स्वागत करेलच, असे प्रतिपादन चव्हाण यांनी केले.
२०१४ पासून काँग्रेसचे महाअधिवेशन नाही
२०१४ नंतर कॉंग्रेसचे अखिल भारतीय स्तरावरील महाअधिवेशन झालेले नाही, अशी माहिती दिली. कॉंग्रेस रस्त्यांवरील आंदोलनात कुठे तरी कमी पडत आहे. ‘सोशल मिडीया’वरील प्रचार-प्रसारातदेखील मागे पडत आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
बुलेट ट्रेनचा फायदा जपानला
बुलेट ट्रेनला आपला विरोध असल्याची भुमिका यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली. बुलेट ट्रेनमुळे जपानमध्ये अक्षरश: बंद पडलेल्या कंपन्यांना नवसंजीवनी मिळाली आहे. या ट्रेनमुळे आपल्या देशाचा कमी आणि जपानचाच जास्त फायदा आहे, असे चव्हाण म्हणाले.
मोदी संघावर पडले भारी
संघाच्या मुशीतून तयार झालेले नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर मात्र त्यांनाच भारी पडले आहेत. संघाच्या पदाधिका-यांचे मोदी ऐकत नाहीत, त्यामुळे संघाला त्यांचा संताप आला आहे. राम माधव, विनय सहस्त्रबुद्धे यांना फेरबदलाच्या वेळी मंत्रीमंडळात स्थान देण्यात यावे, अशा संघाचा आग्रह होता. मात्र मोदींनी त्यांना डाववले. त्यामुळे पुढील २ वर्षात मोदींना शह देण्याचा संघाचा प्रयत्न राहणार आहे, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. निर्मला सितारमन यांना अनुभव नसतानादेखील संरक्षण मंत्रालयासारखे मोठे खाते कसे काय मिळाले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. पंतप्रधानांचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे परराष्ट्र खाते अक्षरश: पोलिसी खाक्याप्रमाणेच चालवत आहेत, असा चिमटादेखील यावेळी चव्हाण यांनी काढला.