गुलाम अलींना विरोध करून आम्ही शहीदांना खरी श्रद्धांजली वाहिली - उद्धव ठाकरे

By admin | Published: October 9, 2015 08:59 AM2015-10-09T08:59:54+5:302015-10-09T09:01:40+5:30

आम्ही जे केले ते आमचे राष्ट्रीय कर्तव्य होते, आम्ही शहीदांना खरी श्रद्धांजली वाहिल्याचे सांगत पाकिस्तानी गझलगायक गुलाम अलींच्या कॉन्सर्टला केलेल्या विरोधाचे उद्धव ठाकरेंनी समर्थन केले आहे.

By opposing Ghulam Ali, we paid homage to the martyrs - Uddhav Thackeray | गुलाम अलींना विरोध करून आम्ही शहीदांना खरी श्रद्धांजली वाहिली - उद्धव ठाकरे

गुलाम अलींना विरोध करून आम्ही शहीदांना खरी श्रद्धांजली वाहिली - उद्धव ठाकरे

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ८ - पाकिस्तानी गझलगायक गुलाम अलींच्या कॉन्सर्टला विरोध करून तो रद्द करायला लावण्याच्या भूमिकेचे शिवसेसेनाप्रमुख उद्धव ठाकरेंनी समर्थन केले आहे. आम्ही जे केले ते आमचे राष्ट्रीय कर्तव्य होते, असे करून आम्ही शहीदांना खरी श्रद्धांजली वाहिल्याचे उद्धव यांनी म्हटले. कला व कलावंतांना आमचा विरोध नाही, पण एका ' दहशतवादी व हिंदुस्थानद्वेषी राष्ट्राला आमचा विरोध' असल्याचा पुनरुच्चार करत फक्त सीमेवर नव्हे तर संगीत, कॉमेडी कार्यक्रमांद्वारे देशातही पाकिस्तानी लोकांची घुसखोरी वाढली असून ती वेळीच थांबवली नाही तर अनर्थ ओढवेल असा इशाराही दिला.
 
'शहीदांचा अपमान का करता?' या शीर्षकाखालील सामानाच्या अग्रलेखातून त्यांनी गुलाम अलींच्या कार्यक्रमाला विरोध झाला म्हणून नाराजी वर्तवणा-यांवरही टीकास्त्र सोडले आहे. ज्या पाकिस्तानातून  रोज हिंदुस्थानच्या भूमीवर रक्ताचे सडे पडत आहेत, त्या रक्तात लडबडलेले गझल सूर ज्यांचे कान तृप्त करतात त्यांच्या देशभावना साफ बधिर झाल्या आहेत. खेळात व कलेत राजकारण आणू नये हे सांगणारे देशभावनेशी बेइमानी करीत आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. 
 
अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे :
-  हिंदुस्थानच्या नकाशावर महाराष्ट्राचे स्थान वेगळे आहे. शौर्य व राष्ट्रभक्ती या दोन गुणांची खाण म्हणजे महाराष्ट्र. त्यामुळे कोणत्याही राष्ट्रीय विचारांची ठिणगी आधी महाराष्ट्रात पडते व मग त्याचा वणवा देशभरात भडकतो, हा इतिहास आहे. म्हणूनच गझल गायक गुलाम अलींच्या मुंबईतील कार्यक्रमास शिवसेनेने फक्त विरोध केला नाही तर वाघाच्या डरकाळीने हा कार्यक्रमच रद्द झाला आहे. आता यावर काही पाकपुरस्कृत मानवतावाद्यांनी आपली बेसूर नरडी उघडली आहेत, पण आम्ही जे केले ते केले.  आम्ही आमचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. पाकड्यांच्या ‘छुप्या’ हल्ल्यात, भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या आमच्या जवानांना शिवसेनेने वाहिलेली ही श्रद्धांजली आहे. शहीदांची फक्त स्मारके उभारून व त्यांच्या शवपेट्यांवर पुष्पचक्रे वाहून श्रद्धांजल्या वाहण्यापेक्षा पाकड्यांना कठोर विरोध व त्यांना रोखणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल. 
- गुलाम अली हे एक कलावंत म्हणून महान वगैरे असतीलही, त्यांच्या गळ्यातून ‘चुपके चुपके’ ‘हंगामा’ बरसत असेलही; पण शेवटी ते पाकिस्तानातून इकडे आले आहेत. जो पाकिस्तान रोज हिंदुस्थानच्या भूमीवर रक्ताचे सडे पाडत आहे त्या रक्तात लडबडलेले गझल सूर ज्यांचे कान तृप्त करतात त्यांच्या देशभावना साफ बधिर झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच कश्मीर खोर्‍यात चार जवान पाकड्या अतिरेक्यांशी लढताना शहीद झाले. गेल्या महिनाभरात पाककडून ५० वेळा शस्त्रसंधींचे उल्लंघन झाले, १०० वेळा गोळीबार झाला व दोन महिन्यांत २० जवान शहीद झाले. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी हिंदुस्थानला ‘अणुबॉम्ब’ टाकण्याची धमकी दिलीच आहे. पाकव्याप्त कश्मीरात हिंदूंना नरकयातना भोगाव्या लागत आहेत. हे सर्व सुरू असताना पाकिस्तानी गझल गायकांचे रेशमी गझल सूर ज्यांना प्रिय वाटत आहेत त्यांना शहीदांच्या कुटुंबीयांचे हुंदके व आक्रोश ऐकायला घराघरांत न्यायला हवे.
- पाकिस्तान हा आपला दुश्मन देश आहे व हिंदुस्थानची राखरांगोळी करणे या एकमेव निर्घृण भावनेनेच पाकडे ५५ वर्षे शर्थ करीत आहेत. मुंबईसह देशभरातील दंगली, बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानच आहे ना? या रक्तपाताचा साधा निषेध तरी या पाकड्या कलावंतांनी कधी केला आहे काय?  राजकीय बहिष्कार, व्यापारी व सांस्कृतिक बहिष्कार टाकून पाकिस्तानची नाकेबंदी करणे, पाकिस्तानी विंचवांना ठेचून काढणे हाच देश वाचविण्याचा मार्ग आहे. हिंदुस्थानात येऊन कार्यक्रम करायचे, पैसे कमवायचे व पुन्हा पाकिस्तानात जायचे. खेळात व कलेत राजकारण आणू नये हे सांगणारे देशभावनेशी बेइमानी करीत आहेत
- जो मानसन्मान आपण गुलाम अलीसारख्या कलाकारांना देतो तो सन्मान हिंदुस्थानी कलाकारांना तिकडे कधीच मिळाला नाही.  ‘पेज ३’वर वाईन व दारूच्या पिचकार्‍या टाकणार्‍यांनाच ही असली थेरं सुचत असतात व त्यांना शहीद जवानांची ‘कुर्बानी’ याद न येता गुलाम अलीसारख्यांचे पुळके येत असतात. आम्हीदेखील तानसेन नसलो तरी कानसेन नक्कीच आहोत, त्यामुळे याप्रश्‍नी आम्हास कुणी शहाणपणा शिकविण्याच्या भानगडीत पडू नये. ज्यांना गुलाम अलींच्या श्रवणीय वगैरे गझला प्रत्यक्ष ऐकायच्या आहेत व गुलाम अलींना आम्ही ‘रोखले’ याबद्दल तीव्र दु:खाचे झटके आले आहेत, त्यांच्या या पाकप्रेमी झटक्यांनादेखील आम्ही या निमित्ताने श्रद्धांजली वाहत आहोत. 
- आम्ही पुन्हा नमूद करतो की, कला व कलावंतांना आमचा विरोध नाही, पण एका दहशतवादी व हिंदुस्थानद्वेषी राष्ट्राला आमचा विरोध आहे. ज्या पाकिस्तानमुळे आमच्या देशात रोजच निरपराध्यांचे बळी जात आहेत व कश्मीर हे जणू हिंदूंचे स्मशान बनले आहे, त्या पाकड्यांना आमचा विरोध आहे. हे जे कलावंत इकडे येतात त्यांच्यात खरंच हिंमत असेल तर त्यांनी त्यांच्या कार्यक्रमांच्या व्यासपीठावरून हिंदुस्थानातील पाकपुरस्कृत दहशतवादाचा, अमानुष हत्याकांडांचा धिक्कार करावा. हार्मोनियमवर बोटे फिरवण्याआधी व गळ्यातून गझलांचे सूर आळवण्याआधी गुलाम अलींसारखे कलावंत पाकहल्ल्यात शहीद झालेल्या आमच्या जवानांना श्रद्धांजली वाहणार आहेत काय? हे जे करू शकतील ते कलावंत खरे मानवतावादी! 
- मानवतावादाची किंमत आम्ही चुकवायची व पाकड्या कलावंतांनी इथे आमच्या रक्ताच्या सड्यावर नाचून-गाऊन ‘वाहवा’ मिळवून पैसे घेऊन पुन्हा पाकिस्तानात निघून जायचे. असे कार्यक्रम आयोजित करणार्‍यांना आधी लाजा वाटल्या पाहिजेत. त्या आयपीएल क्रिकेट संघांचे अनेक ‘कोच’ पाकिस्तानातून आणले गेले आहेत व त्यांनासुद्धा वेळीच रोखण्याची गरज आहे. टी.व्ही. वाहिन्यांनी तर लाज सोडली आहे. अनेक ‘संगीत’, ‘कॉमेडी’ कार्यक्रमातून पाकिस्तानी कलाकारांना आमंत्रित करून हे आयोजक जवानांच्या हौतात्म्यांची चेष्टा करीत आहेत. पाकड्यांची घुसखोरी फक्त सीमेवर नाही तर इथेही वाढली आहे व ती थांबवा; नाही तर अनर्थ ओढवेल, असा इशारा आम्ही स्वदेशी ‘गुलामां’ना देत आहोत. समझने वालों को इशारा काफी है…!
 
 

Web Title: By opposing Ghulam Ali, we paid homage to the martyrs - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.