राजू शेट्टींना विरोध केला, ठाकरेंनी १९ वर्षे जिल्हाप्रमुख पद सांभाळणाऱ्याला हटविले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2024 09:39 AM2024-01-04T09:39:59+5:302024-01-04T09:41:04+5:30
अदानी समुहाच्या प्रकल्पांविरोधातील शेट्टींच्या जनआंदोलनाला ठाकरेंचा पाठिंबा मिळविण्यासाठी भेट घेतल्याचे शेट्टींनी जाहीर केले होते.
दोन दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यंची भेट घेतली होती. याला कोल्हापूर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष मुरलीधर जाधव यांनी विरोध करत शेट्टींचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे, त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊ नका, अशा शब्दांत विरोध केला होता. यावरून उद्धव ठाकरे यांनी जाधव यांची जिल्हाप्रमुख पदावरून उचलबांगडी केली आहे.
अदानी समुहाच्या प्रकल्पांविरोधातील शेट्टींच्या जनआंदोलनाला ठाकरेंचा पाठिंबा मिळविण्यासाठी भेट घेतल्याचे शेट्टींनी जाहीर केले होते. यावरून जाधव यांनी राजू शेट्टींवर गंभीर आरोप केला होता. 2014 ला महायुतीच्या माध्यमातून याच राजू शेट्टींना सर्व शिवसैनिकांनी स्वतःच्या खिशातले पैसे घालून, स्वतःचे डिझेल घालून निवडून आणले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत युती तुटली आणि हेच शेट्टी भाजपात जाऊन बसले, असा आरोप जाधव यांनी केला होता. राजू शेट्टींनी ठाकरेंसोबत गद्दारी केली होती, असेही ते म्हणाले.
हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शेट्टींना उमेदवारी देऊ नका, माझ्यासारख्या निष्ठावंतांची या ठिकाणी इच्छा आहे की मी तिथे लढले पाहिजे. पाच वर्षे शहर प्रमुख, तीन वर्ष तालुकाप्रमुख, 19 वर्षे जिल्हाप्रमुख म्हणून काम करतोय. २००५ मध्ये पक्ष फुटला तेव्हा तुमच्यासोबत राहिलो. आताही तुमच्यासोबत राहिलो. अशा कार्यकर्त्याला जर संधी न मिळता राजू शेट्टींसारखा कुणीतरी आयत्या बिळात नागोबा होण्यासाठी येणार असेल तर जनता त्याचा नक्की विचार करेल, असे जाधव म्हणाले होते.
जाधव यांची हकालपट्टी करतानाच वैभव उगले व संजय चौगुले यांची नवीन जिल्हाप्रमुख म्हणून घोषणाही करण्यात आली. या निर्णयाने नाराज झालेले मुरलीधर जाधव शुक्रवारी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. तब्बल १९ वर्षे जिल्हाप्रमुख असलेले जाधव यांनी संघर्ष करून गोकुळचे संचालकपदी मिळवले होते. या निर्णयाने लोकसभेची हातकणंगलेची जागा शिवसेना कोट्यातून स्वाभिमानीला मिळणार हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. मुरलीधर जाधव हे एकनाथ शिंदे गटात सामील होण्याची शक्यता आहे.