राज्यात विरोधकांची ११ मते फुटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 04:09 AM2017-07-21T04:09:00+5:302017-07-21T04:09:00+5:30
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना महाराष्ट्रातून २०८, तर काँग्रेसच्या मीरा कुमार यांना ७७ मते
विशेष प्रतिनिधी । लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना महाराष्ट्रातून २०८, तर काँग्रेसच्या मीरा कुमार यांना ७७ मते मिळाली. काँग्रेस आघाडीच्या संख्याबळाचा विचार करता त्यांची ११ मते फुटली असून बाद झालेली दोन मतेही त्यांचीच आहेत.
कोविंद यांना मिळालेले मताधिक्य लक्षात घेता शिवसेनेने पाठिंबा काढला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला धोका नसल्याचा तर्क भाजपाच्या गोटातून दिला जात आहे.
भाजपा आणि शिवसेनेचे मिळून १८५ आमदार आहेत. त्यामुळे कोविंद यांना युतीच्या संख्याबळापेक्षा २३ मते अधिक मिळाली, असा तर्क दिला जात असला तरी तो वस्तुस्थितीला धरून नाही. कारण, राज्यातील ७ अपक्ष आमदार हे भाजपासोबत असून त्यांचे नेते आ.रवि राणा यांनी ते कोविंद यांना मतदान करणार हे आधीच जाहीर केले होते. याचा अर्थ भाजपा, शिवसेना आणि अपक्षांचे मिळून १९२ संख्याबळ होते. शिवाय, समाजवादी पार्टीचे मुलायमसिंग यादव यांनी कोविंद यांना पाठिंबा दिला होता हे लक्षात घेता राज्यातील सपाचे एकमेव आमदार अबु आझमी हे कोविंद यांच्या पाठीशी होते. ते आणि बहुजन विकास आघाडीचे दोन सदस्य (एकूण ३, मात्र १ गैरहजर) गृहित धरता एकूण संख्याबळ १९७ होते. कोविंद यांना २०८ मते मिळाली. म्हणजे त्यांना अपेक्षेपेक्षा ११ मते जादा पडली.
दुसरीकडे, काँग्रेस आघाडीचा विचार करता काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादीचे ४१, शेकाप-३, एमआयएम २, माकपा १, आणि भारिप-बहुजन महासंघ १, असे एकूण ९० संख्याबळ होते. मात्र, मीरा कुमार यांना ७७ मते मिळाली म्हणजे आघाडीची १३ मते फुटली. कोविंद यांना मिळालेली ११ जादा मते आणि आघाडीची फुटलेली १३ मते यात दोनचा फरक हा बाद मतामुळे आला असावा. दोन मते बाद ठरली आणि एक सदस्य अनुपस्थित होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मिळून ८३ मते होती. मात्र, मीरा कुमार यांना त्यापेक्षा पाच मते कमी पडली. त्यामुळे या दोन्ही पक्षांची मते फुटली हे स्पष्टच आहे.
कोविंद यांना जी २०८ मते मिळाली त्यातून शिवसेनेची ६३ मते वगळली तरी भाजपा आणि मित्र पक्षांची १४५ मते होतात. भाजपाची स्वत:ची १२२ मते आहेत. याचा अर्थ शिवसेना वगळून कोविंद
यांना भाजपाच्या बाहेरची २३ मते मिळाली. याचा अर्थ उद्या शिवसेनेने फडणवीस सरकारचा पाठिंबा
काढला तरी भाजपाचे सरकार टिकेल असा तर्क भाजपाच्या गोटातून देण्यात येत आहे.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत व्हिप नसतो. त्यामुळे प्रसंगी मत अन्यत्र वळविण्याची मुभा असते. गुप्त मतदानात काँग्रेस, राष्ट्रवादीची काही मते कोविंद यांना मिळाली असली तरी उद्या सरकारवरील विश्वास मतादरम्यान पक्षाचा व्हिप असताना हे आमदार भाजपासोबत जाण्याची जोखीम पत्करतील का, असा प्रश्नही समोर आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी शब्द खरा केला
गेल्या रविवारी मुंबईत झालेल्या भाजपा आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रामनाथ कोविंद यांना कोणत्याही परिस्थितीत २०० पेक्षा अधिक मते मिळतील, असा विश्वास व्यक्त केला होता. त्यांचा शब्द खरा ठरला. कोविंद यांच्या विजयाचे वृत्त येताच भाजपाच्या प्रदेश कार्यालयासमोर त्यांच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला.
रामनाथ कोविंद यांची देशाच्या सर्वोच्च पदावर होणारी ही निवड एका नव्या पर्वाचा प्रारंभ करणारी ठरेल. कोविंद यांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील दीर्घ अनुभव असून जगातील सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्थेचे घटनात्मक प्रमुख म्हणून ते या पदाला निश्चितच वेगळे परिमाण प्राप्त करून देतील असा माझा विश्वास आहे.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री.