उन्हाळ्याच्या सुट्या कमी करण्यास वकिलांचा विरोध
By admin | Published: May 4, 2016 09:40 PM2016-05-04T21:40:19+5:302016-05-04T21:40:19+5:30
देशाचे मुख्य न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर यांनी प्रलंबित खटल्यांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालय व संबंधित खंडपीठातील उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये दोन आठवड्यांची कपात
ऑनलाइन लोकमत
नागपूर. दि. ४ : देशाचे मुख्य न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर यांनी प्रलंबित खटल्यांच्या वाढत्या संख्येबाबत चिंता व्यक्त केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालय व संबंधित खंडपीठातील उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये दोन आठवड्यांची कपात करण्याचे प्रस्तावित आहे. या विचाराधीन निर्णयाला नागपूर खंडपीठातील वकिलांचा जोरदार विरोध आहे. या प्रस्तावाविरुद्ध बुधवारी सर्वसंमतीने ठराव पारित करण्यात आला. हा ठराव न्यायमूर्ती ठाकूर यांना पाठवून सुट्या कमी करण्यात येऊ नये अशी विनंती करण्यात येणार आहे.
यावर्षी उच्च न्यायालयाला ९ मे ते ५ जूनपर्यंत उन्हाळ्याच्या सुट्या आहेत. या २८ दिवसांपैकी १४ दिवसांच्या सुट्या कमी करून या कालावधीत अंतिम सुनावणीसाठी प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे अनेक वकिलांनी हायकोर्ट बार असोसिएशन नागपूरला निवेदन सादर करून या मुद्यावर चर्चा करण्यासाठी विशेष आमसभा आयोजित करण्याची विनंती केली होती. त्यानुसार, बुधवारी संघटनेच्या सदस्यांची आमसभा झाली. त्यात उन्हाळ्याच्या सुट्या कमी करून न्यायालयाने नियमित काम करण्याच्या प्रस्तावाचा जोरदार विरोध करण्यात आला. तसेच, प्रस्तावाविरुद्ध सर्वसंमतीने ठराव पारित करण्यात आला.