गोव्यात ‘एरो डिफेन्स एक्स्पो’ प्रकल्पाला विरोध

By admin | Published: August 10, 2015 12:41 AM2015-08-10T00:41:08+5:302015-08-10T00:41:08+5:30

नियोजित मोपा विमानतळाला होणारा तीव्र विरोध, तेरेखोलच्या गोल्फ कोर्सविरोधात सुरू असलेले आंदोलन, अल्प जमीन क्षेत्राचा मुद्दा पुढे काढून कुंकळ्ळी येथे येणाऱ्या

Opposition to the 'Aero Defense Expos' project in Goa | गोव्यात ‘एरो डिफेन्स एक्स्पो’ प्रकल्पाला विरोध

गोव्यात ‘एरो डिफेन्स एक्स्पो’ प्रकल्पाला विरोध

Next

सुशांत कुंकळयेकर, मडगाव
नियोजित मोपा विमानतळाला होणारा तीव्र विरोध, तेरेखोलच्या गोल्फ कोर्सविरोधात सुरू असलेले आंदोलन, अल्प जमीन क्षेत्राचा मुद्दा पुढे काढून कुंकळ्ळी येथे येणाऱ्या महत्त्वाकांक्षी आयआयटीच्या विरोधात स्थानिकांचा रोेष एवढे कमी म्हणून की काय आता केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रस्तावित ‘एरो डिफेन्स एक्स्पो’ प्रकल्पही होईल की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पणजीपासून ५0 किलोमीटरवरील दक्षिण गोव्यातील नाकेरी-बेतूल गावातील प्रस्तावित प्रकल्पाविरोधात स्थानिक एकवटले आहेत.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी वायुदलाचे द्विवार्षिक ‘एरो डिफेन्स एक्स्पो’ कायमस्वरुपी गोव्यात आयोजित करण्यासाठी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांचे प्रयत्न सुरू आहेत. नाकेरी-बेतूल पठारावर १५0 एकर जागेत प्रकल्प साकारण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने तयारी केली आहे. गोवा सरकारनेही त्यास तत्त्वत: मान्यता दिली आहे.
‘एरो डिफेन्स एक्स्पो’मुळे गोव्यात पर्यटनाला आणखी चालना मिळेल, अशी सरकारची अपेक्षा आहे. मात्र, गोव्यातील बरीचशी जमीन यापूर्वीच भारतीय सैन्याने काबीज केलेली आहे. आता आणखी जमीन सैन्याला देऊ नका, अशी भूमिका स्थानिकांनी घेतली आहे. सर्वात आधी राज्यसभेचे खासदार शांताराम नाईक यांनी प्रकल्पास आक्षेप घेतला होता. मनोहर पर्रीकर विरोधी पक्षनेते असताना सैन्याच्या ताब्यातील जमिनी पुन्हा स्थानिकांना देण्याची मागणी करत होते. मात्र, संरक्षणमंत्री झाल्यानंतर त्यांची भूमिका बदलली.
माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांनीही प्रकल्पाविरोधात आवाज उठवला असून गोव्यात ‘एरो डिफेन्स एक्स्पो’ भरवण्यापेक्षा या जागेचा वापर रोजगारनिर्मिती होईल, असा प्रकल्प आणण्यासाठी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
खुद्द नाकेरी गावात लोक संघटीत झाले आहेत. प्रकल्पाबद्दल पंचायतीलाही अंधारात ठेवण्यात आले. नाकेरी-बेतूल पंचायत क्षेत्रात हा प्रकल्प येतो, हे आम्हाला वृत्तपत्रांतून समजले. या प्रकल्पाबद्दल आम्हाला गोवा सरकारनेही काही सांगितले नाही व केंद्र सरकारनेही. याचीही आम्हाला माहिती नाही, अशी प्रतिक्रिया सरपंच कृष्णा देसाई यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
वास्तविक नाकेरी-बेतूल पठारावरील ही जमीन याआधी गोवा औद्योगिक विकास महामंडळाने फूडपार्कसाठी आरक्षित केली होती. मात्र, नंतर प्रकल्प बारगळला. कुंकळ्ळी गावात यापूर्वी केंद्र सरकारने आयआयटी आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जमीन नसल्याने स्थानिकांनी त्यास विरोध केल्याने प्रस्ताव गुंडाळण्याची वेळ आली होती.

Web Title: Opposition to the 'Aero Defense Expos' project in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.