नाणारच्या रिफायनरीला जनतेचा विरोधच - देसाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 04:59 AM2018-03-06T04:59:45+5:302018-03-06T04:59:45+5:30
नाणार जि. रत्नागिरी येथील रिफायनरी प्रकल्पास स्थानिकांचा तीव्र विरोध असून सर्व ग्रामपंचायतींनी या प्रकल्पाच्या प्रस्तावास विरोध केला आहे. याबाबत जनसामान्यांची भावना लक्षात घेऊन प्रकल्पाबाबतचा निर्णय जाहीर करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.
- विशेष प्रतिनिधी
मुंबई - नाणार जि. रत्नागिरी येथील रिफायनरी प्रकल्पास स्थानिकांचा तीव्र विरोध असून सर्व ग्रामपंचायतींनी या प्रकल्पाच्या प्रस्तावास
विरोध केला आहे. याबाबत जनसामान्यांची भावना लक्षात घेऊन प्रकल्पाबाबतचा निर्णय जाहीर करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.
संबंधित ग्रामपंचायतींचे सरपंच यांच्या शिष्टमंडळाने अलीकडेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. प्रकल्पास स्थानिकांचा विरोध असल्याने प्रकल्पासंबंधातील असहमती पत्रे मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आली. नागरिकांशी बोलून शासन प्रकल्पाबाबत निर्णय घेईल. विरोध कायम असल्यास स्थानिक जनतेवर प्रकल्प लादणार नाही, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. परिणामी मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेत याबाबत सामंजस्य करार होऊ शकला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर प्रकल्पाबाबत निर्णय जाहीर करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे करण्यात आली आहे, असे देसाई यांनी निवेदनात सांगितले. देसाई यांच्या निवेदनादरम्यान राष्ट्रवादीचे भास्कर जाधव अध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन बोलू देण्याची मागणी करू लागले. मात्र, अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी ती अमान्य केली.
स्वतंत्र चर्चा
करणार - मुख्यमंत्री
नाणारच्या प्रकल्पाबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिकाही उद्योगमंत्रीच सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांची नेमकी भूमिका काय आहे? इतर सदस्यांनाही या विषयावर बोलायचे आहे. तेव्हा या विषयावर एक स्वतंत्र चर्चा चालू अधिवेशनात घेण्याची मागणी राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ती मान्य केली.