‘बाजीराव मस्तानी’, ‘दिलवाले’ला विरोध
By admin | Published: December 19, 2015 03:52 AM2015-12-19T03:52:55+5:302015-12-19T03:52:55+5:30
बहुचर्चित ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘दिलवाले’ या दोन्ही बिगबजेट चित्रपटांना प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. भाजपाने ‘बाजीराव मस्तानी’ला तर
- शिवसेना-भाजपा मैदानात
मुंबई : बहुचर्चित ‘बाजीराव मस्तानी’ आणि ‘दिलवाले’ या दोन्ही बिगबजेट चित्रपटांना प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. भाजपाने ‘बाजीराव मस्तानी’ला तर, शिवसेनेने ‘दिलवाले’विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले.
थोरले बाजीराव पेशवे व त्यांच्या कुटुंबीयांचे विकृत चित्रीकरण केल्याचा आक्षेप घेत भाजपा कार्यकर्त्यांनी ‘बाजीराव मस्तानी’च्या विरोधात शुक्रवारी पुण्यातील काही चित्रपटगृहांसमोर आंदोलन केले. त्यामुळे, कोथरूडमधील सिटी प्राईडमधील या चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले. तर, मंगला चित्रपटगृहासमोरही भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करून चित्रपटाचे पोस्टर फाडले. मात्र, तेथे पोलीस बंदोबस्तात चित्रपटाचे शो झाले. संजय लीला भन्साळी यांनी चुकीचा इतिहास दाखविल्याबद्दल ‘बाजीराव मस्तानी’ला कोल्हापुरात पतित पावन संघटनेनेही विरोध केला. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पार्वती मल्टिप्लेक्स व पद्मा टॉकीज या चित्रपटगृहांबाहेर निदर्शने केली. पद्मा चित्रपटगृहाच्या व्यवस्थापनाने दुपारी साडेबारा वाजता होणारा पहिला खेळ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
उस्मानाबाद, जालन्यात ‘दिलवाले’ला विरोध
असहिष्णूतेच्या मुद्यावर अभिनेता शाहरूख खानचा निषेध करीत उस्मानाबाद, जालना तसेच नंदुरबारमध्ये ‘दिलवाले’ला जोरदार विरोध करण्यात आला. तिन्ही ठिकाणी चित्रपटाचे शो रद्द झाले.
उस्मानाबाद शहरातील श्री टॉकीजच्या बाहेर शिवसेना, युवा सेना, महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाहरूख खान, आमीर खानच्या निषेधार्थ घोषणाबाजी करीत चित्रपटाचे पोस्टर फाडून टाकले़ शिवसैनिकांची आक्रमक भूमिका पाहता व्यवस्थापनाने ‘शो’ रद्द केले़ तर, जालन्यात हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्याने ‘दिलवाले’चे तिनही शो रद्द करून चित्रपटगृहासमोर लावलेले पोस्टरही व्यवस्थापनाने काढले.
नंदुरबारमध्ये शिवसेनेने ‘दिलवाले’च्या विरोधात चित्रपटगृह मालकाला निवेदन दिले होते. त्याची दखल घेत चित्रपटगृह चालकांनी या चित्रपटाचा शो रद्द केला.