भाजपचे मुसळे, रेड्डींच्या उमेदवारीवर आक्षेप
By admin | Published: September 30, 2014 12:40 AM2014-09-30T00:40:37+5:302014-09-30T00:40:37+5:30
भारतीय जनता पक्षाचे सावनेर मतदारसंघाचे उमेदवार सोनबा मुसळे आणि रामटेकचे उमेदवार डी. मल्लिकार्जुन रेड्डी हे शासकीय कंत्राटदार असल्याचा आक्षेप घेत त्यांनी दाखल केलेले
आज निकाल : शासकीय कंत्राटदार असल्याचा विरोधकांचा दावा
सावनेर/रामटेक : भारतीय जनता पक्षाचे सावनेर मतदारसंघाचे उमेदवार सोनबा मुसळे आणि रामटेकचे उमेदवार डी. मल्लिकार्जुन रेड्डी हे शासकीय कंत्राटदार असल्याचा आक्षेप घेत त्यांनी दाखल केलेले उमेदवारी अर्ज रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेत उद्या, मंगळवारपर्यंत निर्णय राखून ठेवला.
भाजपचे सावनेरचे उमेदवार सोनबा मुसळे हे मुसळे कन्स्ट्रक्शनचे भागीदार असून, त्याद्वारे शासकीय कामाचे कंत्राट घेतले असल्याचा आरोप मनीष मोहोड (रा. माळेगाव) यांनी करीत लेखी तक्रार नोंदविली. त्यावर निवडणूक निर्णय अधिकारी विनोद हरकंडे मुसळे यांना सायंकाळी ५ पर्यंत लेखी स्पष्टीकरण सादर करण्याची सूचना केली. ५ वाजता दोन्ही पक्षाचे म्हणणे ऐकून घेतल्यावर उद्या सकाळपर्यंत निर्णय राखून ठेवला.
यावेळी दोन्ही गटाकडील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सावनेरमध्येच एका प्रकरणात अपक्ष उमेदवार उज्ज्वलकुमार बागडे यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील केदार यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला. अपूर्ण माहिती तसेच माहिती दडवून खोटे प्रमाणपत्र सादर केल्याने उमेदवारी रद्द करण्याची लेखी तक्रार पुराव्यासह केली. मात्र उमेदवारी अर्ज छाननीची वेळ निघून गेल्यानंतर हा आक्षेप घेतल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केदार यांचा उमेदवारी अर्ज मंजूर केला.
रामटेकमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांच्यावर शिवसेनचे उमेदवार अॅड. आशिष जयस्वाल आणि गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या उमेदवार राणी राजश्रीदेवी बुलंदशहा यांनी आक्षेप नोंदविला. शासनाकडून लाभ घेत असलेल्या व्यक्तीला निवडणूक लढता येत नाही, या कारणासाठी त्यांनी रेड्डी यांच्याविरुद्ध आक्षेप नोंदविला. याबाबत रेड्डी यांनी आपले म्हणणे लेखी स्वरूपात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केले. सदर प्रकरणाबाबत कायदेशीर बाबी तपासून पाहण्यात येणार आहेत. या प्रकरणाचा निकाल राखून ठेवण्यात आला असून, उद्या, मंगळवारी दुपारी ३ वाजता घोषित करण्यात येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह यांनी सांगितले. रेड्डी यांना यासंबंधात विचारले असता काही दिवसांपूर्वीच त्यांनी फर्म आरबीसीमधून सेवानिवृत्ती घेतलेली आहे. तसे प्रमाणपत्र त्यांच्याकडे आहे. परंतु ते अर्जासोबत जोडले नव्हते, असे त्यांनी सांगितले. आक्षेप घेतल्यानंतर मात्र ते प्रमाणपत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
(प्रतिनिधी/तालुका प्रतिनिधी)