विकृतीतून काँग्रेसचा विकासाला विरोध
By admin | Published: May 25, 2015 12:47 AM2015-05-25T00:47:45+5:302015-05-25T00:48:23+5:30
नितीन गडकरींचा हल्लाबोल : भाजपचा राज्य परिषद सांगता समारंभ
कोल्हापूर : देशातील सामान्य माणसाचा आर्थिक विकास होण्यासाठी केंद्र सरकारने विकासाचे मॉडेल तयार केले आहे; पण विकृत मानसिकतेतून भूमी अधिग्रहण कायद्याला कॉँग्रेस विरोध करीत असल्याची टीका केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केली. स्वत:ला ‘जाणता राजा’ म्हणवणाऱ्यांच्या काळात महाराष्ट्राचा शेती विकास दर घसरला कसा? कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सरकारने काय केले? अशी बोचरी विचारणाही त्यांनी यावेळी केली.
भाजपच्या तीनदिवसीय प्रदेश कार्यकारिणी व राज्य परिषदेच्या सांगता समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे होते. गडकरी म्हणाले, कॉँग्रेसच्या ६५ वर्षांच्या राजवटीत काय मिळाले? भूकबळी, भ्रष्टाचार बोकाळला. शेतकऱ्यांनी आत्महत्या सुरू केल्या. कॉँग्रेस सरकारच्या धोरणाला कंटाळून जनतेने मोठ्या विश्वासाने आम्हाला सत्ता दिली आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती व राष्ट्राचा सर्वांगीण विकास ही पक्षाची वैशिष्ट्ये असून सुशासन, विकास व डिजिटल इंडिया हे आपले भविष्य असल्याचे त्यांनी सांगितले.
शरद पवार कृषिमंत्री असताना गुजरातचा कृषी विकास दर १४ टक्के, तर मध्यप्रदेशचा २३ टक्के होता, त्यावेळी महाराष्ट्राचा दर ऋण (उणे) होता. ‘जाणत्या राजा’चे सरकार होते तर विकासदर ऋण कसा? सिंचन प्रकल्पात भ्रष्टाचार करून धरणांची कामे बंद पडल्याने महाराष्ट्राची ही अवस्था झाली; पण फडणवीस सरकारने ‘जलशिवार योजना’ सुरू केली आहे, तिची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले. गरिबी दूर करणे व विकासासाठी भूमी अधिग्रहण कायदा आणला असताना आता काँग्रेस आडकाठी का आणता? अशी विचारणाही गडकरी यांनी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपली आता उपहास, विरोधी आणि सर्वमान्यता अशी लढाई सुरू झाली आहे. शासन, प्रशासन भ्रष्टाचारमुक्त आणि गतिमानतेने चालवायचे आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १५ वर्षांच्या काळ्या कारभारानंतर आपल्या हाती जनतेने सत्तेच्या चाव्या दिल्या. शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन करण्यांसह महाराष्ट्र शेतकऱ्यांचा आहे हे दाखवून दिले जाईल. जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रास्ताविक केले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मनोगत व्यक्त केले. पी. सतीश, शाम जाजू, मंत्री विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विद्या ठाकूर, चंद्रकांतदादा पाटील, गिरीश बापट, हंसराज अहिर, भाऊसाहेब फुंडकर यांच्यासह राज्यमंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित होते.
दादा, कोल्हापुरात ‘इथेनॉल’वर बस चालवा
आपण आठ लाख कोटी रुपयांचे डिझेल, पेट्रोल व गॅस आयात करतो. डॉलरची किंमत लक्षात घेऊन पेट्रोलला पर्याय असलेल्या इथेनॉलवर आम्ही नागपूरमध्ये बसेस सुरू केल्या. त्याच धर्तीवर दादा, तुम्ही कोल्हापुरात बसेस चालवा, असे आवाहन केंद्रीय मंत्री गडकरी यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना केले.
‘आगे बढो’च्या घोषणा, जल्लोष...
प्रदेशाध्यक्ष दानवे हे भाषण सुरू करताच मंडपातील दहा ते बारा कार्यकर्ते उभे राहिले आणि त्यांनी ‘दादा, तुम आगे बढो...’ अशा घोषणा सुरू केल्या. एक-दोन मिनिटे घोषणा देऊन ते खाली बसले. संबंधित कार्यकर्त्यांच्या घोषणा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासाठी होत्या, अशी चर्चा सुरू होती. तत्पूर्वी, प्रदेशाध्यक्ष दानवे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी आमदार अमल महाडिक यांच्या नावाचा उल्लेख होताच, त्यांच्या समर्थक-कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाने जोरदार घोषणा आणि टाळ्यांचा कडकडाट केला.
तेलावर साखर
ब्राझीलमधून १६ रुपये किलोची साखर बाजारात आल्याने आमच्या साखरेला कोणी विचारीत नाही. मलेशियासारख्या देशातून तेल खरेदी करताना आमची साखर घ्या, मगच तुमचे तेल घेतो, अशी धमकी दिली तरीही कोणीही साखर घेण्यास तयार होत नसल्याचे गडकरी यांनी सांगितले.
गडकरी म्हणाले...
एक वर्षात एक लाख कोटींचे महामार्ग बांधणार.
रस्ते बांधकामाचा वेग दिवसाला १४ कि.मी.
अटल पेन्शन योजना, सुरक्षा विमा, जीवन ज्योती विमा योजना प्रभावीपणे राबवा.
वर्षात केवळ रस्ते विकासातून दोन टक्के जीडीपी वाढणार
रोजगार व व्यवसायाभिमुख शिक्षणावर राज्याने भर द्यावा.
शेतकऱ्यांनी उसाचे क्षेत्र कमी करून तेलबियांचे उत्पादन घ्यावे.
ज्ञान-विज्ञान, तंत्रविज्ञानातून विकासावर भर.