घराणेशाहीला होणार विरोध
By admin | Published: January 16, 2017 03:58 AM2017-01-16T03:58:13+5:302017-01-16T03:58:13+5:30
महापालिकेच्या रणसंग्रामात काही राजकीय घराणी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात नव्या पिढीसह सज्ज झाली
अजित मांडके,
ठाणे- महापालिकेच्या रणसंग्रामात काही राजकीय घराणी पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात नव्या पिढीसह सज्ज झाली आहेत. यात दस्तुरखुद्द ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह तरे, सरनाईक, पाटील, इंदिसे, भोईर अशी कुटुंबे पुन्हा उतरण्याच्या तयारीत असल्याने त्यात्या प्रभागात अनेक वर्षे तिकिटीच्या आशेवर असलेल्यांमध्ये निराशेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे त्यांनी बंडाचे झेंडे हाती घेण्याचा निर्धार केला आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी हे अस्त्र उघडपणे उगारण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. विविध पक्षांच्या नेत्यांनी मात्र यावर सावध पवित्रा घेत अजून उमेदवारही ठरलेले नाहीत, असा दावा केला आहे.
आमच्या पक्षात घराणेशाही नसल्याचा किंवा घरातच भाकरी फिरवणार नसल्याचा दावा जरी शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जात असला, तरी आता याच मंडळींकडून आपल्या घरातील तिसऱ्या पिढीला किंवा भावाला, पुतण्याला मैदानात उतरविण्याच्या हालचाली सुरू असल्याचे समजते. ‘निवडून येण्याची आणि प्रसंगी सढळहस्ते खर्च करण्याची क्षमता’ हा निकष त्यासाठी लावला जातो आहे.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुलाला खासदारकी दिल्यानंतर आता त्यांचा भाऊ प्रकाश यांना नगरसेवकपद मिळावे यासाठी त्यांचे नाव पुढे केले जात आहे. दुसरीकडे संजय राऊत यांच्या नात्यात असलेल्या मयुरेश जोशी यांच्यासाठीही अशाच निष्ठावंताचा बळी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. हरिश्चंद्र पाटील हे देखील शिवसेनेतील सध्याचे वजनदार व्यक्तिमत्व मानले जाते. कॉंग्रेसमधून शिवसेनेत आल्यावर त्यांना थेट महापौरपद मिळाले. त्यामुळे त्यांच्या अपेक्षा वाढल्या असून चार तिकीटांसाठी त्यांनी पक्षावर दबाव आणण्यास सुरवात केल्याची माहिती शिवसेनेच्या सुत्रांनी दिली. त्यांची मागणी मान्य केल्यास पक्षातील इतर कार्यकर्त्यांचा बळी शिवसेनेला द्यावा लागणार आहे.
‘मातोश्री’च्या संपर्कात असलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी मागील निवडणुकीत पत्नी आणि मोठ्या मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतविले होते. आता त्यांनी आपला लहान मुलगा आणि अन्य एका सहकाऱ्यासाठी मिळून चार जागा मागतिल्याची माहिती समोर येत आहे. अनंत तरे या घराण्यातील मंडळी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांनीही दोन जागांवर दावा केला आहे. तो मान्य केला, तर प्रस्थापित नगरसेवकालाच बाजूला करावे लागणार आहे.
राष्ट्रवादीमधील भोईर यांच्या घराण्यातील सध्या तिघे नगरसेवक असून यात देवराम भोईर, संजय भोईर आणि संजय यांच्या पत्नी उषा यांचा समावेश आहे. आता त्यांनीही पक्षाकडून सहा जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या जागा मिळाल्या नाहीत, तर मात्र पक्ष बदलीचे संकेतही त्यांच्याकडून दिले जात आहेत. परंतु ते ज्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत, त्याठिकाणी आधीच इच्छुकांचा जोरदार भरणा आहे. त्यामुळे त्यांनी पक्ष बदल केलाच तर त्यांना तेथे सहा जागा मिळणार का हा प्रश्न आहे. ते जाणार असलेल्या पक्षातही बंडखोरी अटळ मानली जाते. या घराण्यांपोठापाठ श्रीनगरमधील स्थानिक नगरसेवक मनोज शिंदे यांनीही पक्षाकडे चार जागांची मागणी केली आहे.
>कुटुंबातील व्यक्तीकडेच हव्यात चाव्या
शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीत काही घराण्यांनी आपल्याच कुटुंबातील व्यक्तींच्या हाती सत्तेच्या चाव्या रहाव्या म्हणून तिकीटांसाठी हट्ट धरला आहे. कारणे काहीही असोत, त्याचा नेमका किती फटका पक्षाला बसतो, ते उमेदवारी जाहीर होण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत दिसेल. राजकीय पक्षातील नेहमीच्या बोलक्या नेत्यांनी किंवा प्रवक्त्यांनी मात्र घराणेशाहीच्या वृत्तीवर मिठाची गुळणी धरली असून अजून नावे निश्चित झालेली नाहीत, असे सांगत यावर भाष्य करणे टाळले.
या घराण्यांपोठापाठ श्रीनगरमधील स्थानिक नगरसेवक तथा कॉंग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनीही पक्षाकडे चार जागांची मागणी केली आहे. यात त्यांची पत्नी, भाऊ आणि कुटुंबातील अन्य एक सदस्य आहे.