सरकारच्या पाकीटबंद खाऊला विरोध, आज देशव्यापी आंदोलनाची हाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 02:15 AM2017-09-22T02:15:38+5:302017-09-22T02:15:41+5:30
आयसीडीएस योजनेत थेट रोख रक्कम हस्तांतरण व अंगणवाड्यांमध्ये पाकीटबंद आहाराचे वितरण करण्याला अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशनने (आयफा) विरोध केला आहे.
मुंबई : आयसीडीएस योजनेत थेट रोख रक्कम हस्तांतरण व अंगणवाड्यांमध्ये पाकीटबंद आहाराचे वितरण करण्याला अखिल भारतीय अंगणवाडी सेविका व मदतनीस फेडरेशनने (आयफा) विरोध केला आहे. शिवाय सरकारच्या निर्णयाविरोधात २२ व २३ सप्टेंबर रोजी देशभरात निषेध आंदोलनाची हाक दिली आहे.
आयफाच्या महासचिव ए.आर. सिंधू यांनी सांगितले की, देशभरात निषेध आंदोलन करत सरकारचे प्रतीकात्मक पुतळेही जाळण्यात येतील. राज्यातील अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपालाही आयफाने पाठिंबा जाहीर केला आहे. केंद्र सरकारने ताजा गरम आहार बंद करून खाण्यासाठी तयार कोरडा पाकीटबंद आहार देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र अनेक अहवाल व अभ्यासांमधून कुपोषण निर्मूलनातील हा आहार उपयुक्त नसल्याचे निदर्शनास आले आहे. याउलट अंगणवाडीच्या योगदानाकडे शासन सतत दुर्लक्ष करीत आहे. याशिवाय ३०० जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर लाभार्थ्यांच्या खात्यात रोख रकमेचे हस्तांतरण करण्याची सुरुवात केंद्र सरकारने केली आहे. या निर्णयाचाही आयफाने निषेध केला आहे. आयफाच्या म्हणण्यानुसार, वर्षानुवर्षे झोकून देऊन काम करणाºया देशातील २६ लाख महिलांच्या रोजगारावर यामुळे गदा येणार आहे.
>पोषण आहार वाटण्यास आशा वर्करचा नकार
अंगणवाडी कर्मचाºयांनी पुकारलेल्या संपामुळे राज्य शासनाने बुधवारी रात्री पोषण आहार वाटपाचे काम आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांकडे सोपवले आहे. मात्र आशा आणि गटप्रवर्तकांच्या महाराष्ट्र राज्य आशा वर्कर्स फेडरेशनने पोषण आहार वाटपाचे काम करण्यास गुरुवारी नकार दिला. अंगणवाडी कर्मचाºयांच्या संपाला पाठिंबा देत आंदोलनात उतरण्याची तयारी दर्शवली आहे.