विरोधकांचा आत्मविश्वास हरवलाय : मुख्यमंत्री; अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांवर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 07:13 AM2024-02-26T07:13:13+5:302024-02-26T07:13:45+5:30
रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सरकारची विकासकामे पाहून विरोधकांचा आत्मविश्वास हरवला आहे. त्यामुळे त्यांनी चहापानावर बहिष्कार घालण्याची परंपरा आजही कायम ठेवलीय, त्यांना जनतेच्या कामापेक्षा राजकारणात जास्त रस आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या चहापानानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, हे डबल इंजिन सरकार चांगले काम करतेय. त्यामुळे विरोधकांच्या पोटात गोळा आला आहे. मराठा समाजाबाबत दिलेला शब्द आम्ही पाळला आहे आणि राज्यातील अटल सेतु, कोस्टल रोड, शेतकऱ्यांची कर्जमाफी यासह राज्यातील जनतेची कामे करण्याला सरकार प्राधान्य देत आहे.
सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला : फडणवीस
विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात अंतिम आठवडा प्रस्तावाचा मसुदा कळवला. नेमके कशावर लक्ष केंद्रीत करावे, हे विरोधी पक्षांना लक्षात येत नाहीये. त्यामुळे त्यांची स्थिती गोंधळल्यासारखी आहे. अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मराठा समाजासंदर्भात १० टक्के आरक्षणाचा कायदा तयार करून सरकारने दिलेला शब्द पूर्ण केला आहे, असेही ते म्हणाले.
एक पत्र त्यांनाही द्या...
विरोधकांच्या पत्रात एक वाक्य मला मनोरंजक वाटले. त्यात म्हटलेय सभांमध्ये अर्वाच्य भाषा, शिवीगाळ यामुळे महाराष्ट्राच्या संस्कृतीला गालबोट लागले, आता हे पत्र आमच्यासाठी लिहिलेय, की रोज सकाळी जे पत्रकार परिषद घेतात, त्यांच्यासाठी? महाराष्ट्राच्या संस्कृतीची चिंता असेल, तर एक पत्र त्यांनाही द्या, असा टोला फडणवीस यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना नाव न घेता लगावला.