जेएनपीटी-दिल्ली कॉरिडोरला सरावली येथील सभेत विरोध
By admin | Published: February 27, 2017 03:11 AM2017-02-27T03:11:23+5:302017-02-27T03:11:23+5:30
बागायतदारांच्या आणि शेतकऱ्यांच्या शेतीतून नेऊन त्यांना विस्थापित करण्याच्या रेल्वेच्या धोरणाला बागायतदारांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
शौकत शेख,
डहाणू- पश्चिम रेल्वेच्या वाणगाव, डहाणू आणि घोलवड रेल्वे स्थानकाच्या लगत असलेल्या हजारो एकर सरकारी जागेतून सरळ मार्गाने रेल्वे न नेता ती पूर्वेकडील गावांतून तब्बल दोन कि.मी. अंतरावरील शेकडो बागायतदारांच्या आणि शेतकऱ्यांच्या शेतीतून नेऊन त्यांना विस्थापित करण्याच्या रेल्वेच्या धोरणाला बागायतदारांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
जेएनपीटी - दिल्ली या प्रस्तावित रेल्वे मार्गासाठी शेतकऱ्यांना कोणताही मोबादला न देता सरकार आणि रेल्वे प्रशासन मनमानी पद्धतीने जमिनी देण्याची सक्ती करीत आहे. त्याविरूद्ध प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येऊन रविवारी सरावली येथे रेल्वे कॉरीडोअर विरोधी समिती स्थापन केली. काही बागायतदारांनी एक संयुक्त सभा घेऊन या विरोधात न्यायालयीन लढा तीव्र करण्याचा निर्धार केला आहे.
डहाणू ते घोलवड दरम्यान अल्प भूधारकांच्या जमिनी असून सरकारने त्यांना कवडीमोल मोबदला देण्याचे धोरण ठरवल्याने त्याविरोधात शेतकरी पेटून उठले आहेत. आम्हाला पुरेशा प्रमाणात जमिनीचा मोबदला दिल्याशिवाय आम्ही जमिनी देणार नाही अशी भूमिका शेतकरी, बागायदार, ग्रामस्थांनी घेतली आहे. येथील मोठ मोठ्या बागायत वाडीतून ही रेल्वे जाणार असल्याने या वाड्यांचे दोन ते चार भाग होणार असून त्याविरोधात रिट पिटिशन दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश गांधी , डहाणूचे माजी नगराध्यक्ष मिहीर शहा, कॉरीडोर विरोधी समितीचे रवि फाटक, धनसुख माच्छी, विष्णू माच्छी, वेस्ता माच्छी यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.