महापौर ठरविणार विरोधी पक्षनेता

By admin | Published: March 12, 2017 12:16 AM2017-03-12T00:16:06+5:302017-03-12T00:16:06+5:30

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरल्यानंतरही विरोधकांच्या बाकावर बसण्यास भाजपाने नकार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेते

Opposition leader to decide mayor | महापौर ठरविणार विरोधी पक्षनेता

महापौर ठरविणार विरोधी पक्षनेता

Next

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पक्ष ठरल्यानंतरही विरोधकांच्या बाकावर बसण्यास भाजपाने नकार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपदावर दावा केला आहे, परंतु भाजपा आपण हक्क सोडत असल्याचे लिहून देत नसल्याने या पदाचा तिढा अद्यापही कायम आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय आता महापौर विश्वनाथ महाडेश्वर शुक्रवारी होणाऱ्या महासभेत जाहीर करतील.
भाजपाने ‘यू टर्न’ घेत महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांना मतदान केले. मात्र सत्तेत सहभागी नसल्याने महापालिकेतील दुसरा मोठा पक्ष म्हणून भाजपाच विरोधी पक्ष ठरतो. नियमाप्रमाणे या पक्षाच्या गटनेत्याला विरोधी पक्षनेता जाहीर करणे अपेक्षित आहे. मात्र पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून महापालिकेत काम करणार, असे जाहीर करणाऱ्या भाजपाला विरोधी पक्षात बसायची इच्छा नाही. परंतु असे लेखी चिटणीस खात्याला कळविण्यास भाजपा तयार नसल्याने विरोधी पक्ष कोण, असा पेच प्रशासनापुढे निर्माण झाला आहे. त्यामुळे चिटणीस खात्यामार्फत कायदेशीर सल्ला घेण्यात येत आहे. त्यानंतर शुक्रवारच्या पहिल्या महासभेत महापौर विरोधी पक्षाचे नाव जाहीर करणार आहेत. (प्रतिनिधी)

काँग्रेसचा युक्तिवाद
महापौर व उपमहापौरपदासाठी शिवसेना उमेदवारांना भाजपाने मतदान केल्याने पालिका कायदा १८८८ कलम ३७-१ अ मधील नियमानुसार काँग्रेस हाच विरोधी पक्ष ठरतो, असा दावा काँग्रेसने केला आहे. काँग्रेसचे ३१ नगरसेवक निवडून आले आहेत. त्यांचा गटनेता हाच विरोधी पक्षनेता ठरतो, असा युक्तिवाद काँग्रेसचे गटनेते रवी राजा यांनी चिटणीस खात्याला पाठविलेल्या पत्रातून मांडला आहे.

प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष भाजपाच विरोधी पक्ष
भाजपाने विरोधी पक्ष बनण्यास नकार दिला, तरी पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून आपले नगरसेवक काम करतील, असे भाजपाने जाहीर केले आहे. जनतेच्या हिताच्या प्रस्तावांवरच शिवसेनेला समर्थन देणार, अन्यथा आक्षेप घेऊ, असे जाहीर करून भाजपाने आपले इरादे आधीच स्पष्ट केले आहेत. त्यामुळे विरोधी पक्षाच्या बाकावर भाजपा बसो अथवा न बसो, भाजपाच विरोधकाची भूमिका बजावणार हे निश्चित आहे.

Web Title: Opposition leader to decide mayor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.