"स्वतःच्या पक्षाने चुकीचे निर्णय घ्यावे अन्..."; विजय वडेट्टीवार यांचा केंद्र सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 12:17 PM2024-02-21T12:17:07+5:302024-02-21T12:18:26+5:30
महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकार आणि भाजपावर निशाणा साधला आहे.
केंद्र सरकारनेकांदा निर्यातबंदी उठवल्यामुळे आता कांद्याला चांगला भाव मिळेल, अशा अपेक्षेने शेतकऱ्यांनी आनंद साजरा केला. मात्र, कांदा निर्यातबंदी हटवल्याच्या निर्णयाचा आनंद काही काळापुरताच राहिल्याचे निष्पन्न झाले. निर्यात खुली झाल्याची चर्चा सुरू असताना दुसरीकडे केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाचे सचिव रोहित कुमार सिंगयांनी कांदा निर्यातबंदी ३१ मार्चपर्यंत लागू राहील असे वक्तव्य केल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा मावळल्या आहेत. शिवाय निर्णयाबाबत सरकारामध्येच संभ्रम असल्याचे चित्र आहे.
केंद्र सरकारच्या या भूमिकेमुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकार आणि भाजपावर निशाणा साधला आहे. स्वतःच्या सरकारने लादलेली कांदा निर्यात बंदी हटवण्यात आल्याचा जल्लोष करून स्वतः श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्यातील भाजपाचे मंत्री आणि नेत्यांनी केल्याचे आता उघड झाले आहे. गाजावाजा करत जल्लोष करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचा भाजपाचा हा प्रयत्न होता का?, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत उपस्थित केला आहे.
निर्यात बंदी उठवण्यात आलेली नाही. सद्या:स्थितीत केंद्र सरकारच्या निर्णयात कोणताही बदल होणार नाही.असे केंद्राकडून सांगण्यात आलेले आहे. लोकसभा निवडणुक पूर्ण झाल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल ही शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्वतःच्या पक्षाने चुकीचे निर्णय घ्यावे आणि नंतर तो निर्णय बदलून शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी निर्णय घेतल्याचे आव आणणे आता भाजपाने बंद करावे. निवडणूक आणि श्रेयवादाचं राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या आणि राज्यातील जनतेच्या हिताचे राजकारण करण्याकडे भाजपाने लक्ष द्यावे, असं आवाहन देखील विजय वडेट्टीवर यांनी केलं आहे.
स्वतःच्या सरकारने लादलेली कांदा निर्यात बंदी हटवण्यात आल्याचा जल्लोष करून स्वतः श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्यातील भाजपचे मंत्री आणि नेत्यांनी केल्याचे आता उघड झाले आहे. गाजावाजा करत जल्लोष करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भ्रमित करण्याचा भाजपचा हा प्रयत्न होता का ?
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) February 21, 2024
कोण काय म्हणाले?
कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे म्हणाले की, कांदा निर्यात बंदी 31 मार्चपर्यंत कायम असून मुळात कांदा निर्यातबंदी उठवलीच नव्हती. मात्र या घोषणेमुळे शेतकरी संभ्रमात आहेत. आम्ही हेच सांगितलं की, जोपर्यंत केंद्र सरकारकडून कांदा निर्यातबंदी उठल्याचं अधिकृत नोटिफिकेशन निघत नाही, तोपर्यंत यावर विश्वास ठेवता येणार नाही. सरकारने तत्काळ कांदा निर्यात बंदी हटवली नाही तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांकडून मतपेटीतून याचे उत्तर दिले जाईल, असा इशारा दिघोळे यांनी दिला आहे. तर निर्यात खुली होणार या आशेने शेतकऱ्यांनी कांदा घरात साठवला, मात्र शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून निर्यात खुली होण्याच्या चर्चा होत्या. मात्र निव्वळ घोषणा झाली. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना फसवलं असल्याचे मात शेतकरी संघटनेचे निवृत्ती न्याहारकर यांनी सांगितले.