दीड हजार देऊन महिलांना मारायचं लायसन्स मिळालं का? वडेट्टीवारांचा महायुती सरकारला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 06:56 PM2024-08-08T18:56:21+5:302024-08-08T18:58:27+5:30

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरुन सरकारवर निशाणा साधला

Opposition leader Vijay Wadettiwar targeted Mahayauti government over the Majhi Ladki Bahin Yojana | दीड हजार देऊन महिलांना मारायचं लायसन्स मिळालं का? वडेट्टीवारांचा महायुती सरकारला सवाल

दीड हजार देऊन महिलांना मारायचं लायसन्स मिळालं का? वडेट्टीवारांचा महायुती सरकारला सवाल

Vijay Wadettiwar on Majhi Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. महायुती सरकारने अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेची घोषणा केली. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकांतील महिलांना राज्य सरकार प्रति महिना १५०० रुपयांचा हप्ता देणार आहे. त्यामुळे सरकारी तिजोरीवर आर्थिक भार पडेल अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे. लाडकी बहीण योजना बंद करण्यासाठी सावत्र भाऊ प्रयत्न करत असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. यावरुनच आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला.

लाडकी बहीण योजनेवरुन टीका होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केलं होतं. लाडकी बहीण योजना आणल्यानंतर विरोधकांनी टीका केली की, लाडक्या भावांचं काय? मग आम्ही लाडका भाऊ योजनाही आणली. मात्र, ही योजना बंद पडावी आणि लाडक्या बहि‍णींना पैसे मिळू नये, म्हणून हे कपटी सावत्र भाऊ हे न्यायालयात पाठवत आहेत. न्यायालयात आमच्या लाडक्या बहि‍णींना न्याय मिळेल. लाडक्या बहिणी या कपटी आणि सावत्र भावांना धडा शिकवतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. त्यावर आता विरोझी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिलं आहे.

"महाराष्ट्रातील १५ हजार बहिणी गायब झाल्या त्यावेळी सत्ताधारी म्हणून लाज वाटत नव्हती. महिला अत्याचारामध्ये महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर आला तेव्हा लाज वाटत नाही. दीड हजार देण्यापेक्षा महिलांच्या संरक्षणाची हमी दिली असती तर आशीर्वाद मिळाला असता. दीड हजार देऊन तीर मारल्याच्या गोष्टी सांगू नका. हे निवडणुकीपर्यंतच असणार आहे. महाराष्ट्राची तिजोरी लुटून साफ करण्याचे पाप केलं आहे. दुसऱ्याला सावत्र भाऊ म्हणता पण खऱ्या अर्थाने तुम्ही महाराष्ट्रातील महिलांचे शत्रू आहात. सत्तेत येऊन अडीच वर्ष झाली तेव्हा लाडकी बहीण आठवली नाही," अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.

यावेळी विजय वडेट्टीवार यांनी बुलढाणा येथे भाजपच्या सभापतींली महिलेल्या पोलीस ठाण्यात केलेल्या मारहाणीवरुन भाष्य केलं आहे. मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतींनी पोलीस स्टेशनमध्येच एका महिलेला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. "सत्ताधारी पक्षांची काय हिम्मत वाढली आहे. पोलीस ठाण्यात भाजपच्या सभापतीकडून महिलांना मारहाण केली जाते. दीड हजार रुपये देऊन महिलांना मारण्याचे लायसन्स तुम्हाला दिलं आहे का? महाराष्ट्राच्या महिलांना संरक्षणाची हमी द्या. दीड हजार रुपये काय आमचं सरकार येऊ दे आम्ही तीन हजार रुपये देऊ," असं आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिलं.
 

Web Title: Opposition leader Vijay Wadettiwar targeted Mahayauti government over the Majhi Ladki Bahin Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.