विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी पोलिसांची हेरगिरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2018 10:55 PM2018-01-25T22:55:07+5:302018-01-25T22:55:21+5:30

विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत विशेष शाखेचे दोन पोलीस कर्मचारी हेरगिरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Opposition Leader Wicha-Patil's secretariat police's official residence! | विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी पोलिसांची हेरगिरी!

विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी पोलिसांची हेरगिरी!

Next

मुंबई- विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत विशेष शाखेचे दोन पोलीस कर्मचारी हेरगिरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. यावर विखे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, यासंदर्भात ते शुक्रवारी राज्यपालांकडे तक्रार करणार आहेत.

कमला मिलची आग आणि विदर्भातील कीटकनाशक फवारणीप्रकरणी विखे पाटील यांनी गुरुवारी सायंकाळी मंत्रालयासमोरील आपल्या शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत दोन अनोळखी इसम पत्रकारांची छायाचित्रे काढताना आढळून आले. त्यांची माहिती घेतली असता ते विशेष शाखेचे पोलीस कर्मचारी असल्याचे निष्पन्न झाले. हा गंभीर प्रकार समोर येताच विरोधी पक्षनेत्यांनी तातडीने मुंबई पोलीस आयुक्तांना दूरध्वनी करून यासंदर्भात विचारणा केली. त्यावर त्यांनी याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे सांगितले. विरोधी पक्षनेत्यांनी त्यांना यासंदर्भात तातडीने माहिती घेऊन दोषींविरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली.

दरम्यान, यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, हा प्रकार म्हणजे घटनात्मक पद असलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या मुलभूत हक्कांचा भंग आहे. या सरकारचा संविधानावर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्यांवर पाळत ठेवण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. त्यामुळेच विरोधी पक्षांना संविधान बचाव यात्रा काढावी लागत असून, तशी वेळ का आली, याचा पुरावा आज माझ्या पत्रकार परिषदेत मिळाला.

हे सरकार संविधान, लोकशाही, प्रजासत्ताक ही मूल्य नाकारणाने सरकार आहे. हे सरकार एकाधिकारशाही आणि एकसत्ताक राज्य मानते. या सरकारला विरोधक नको आहेत. जे विरोध करतात ते यांच्यासाठी देशद्रोही आहेत. मुन्ना यादवचा पत्ता देऊन यांना मुन्ना यादवला पकडता येत नाही आणि अशा समाजकंटकांची माहिती देणाऱ्या विरोधी पक्षनेत्याच्या शासकीय निवासस्थानी मात्र पोलिस पाठवले जातात. इतकेच नव्हे तर आपले दूरध्वनी देखील टॅप होत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. या गंभीर प्रकरणाबाबत गृह खात्याविरोधात मी शुक्रवारी राज्यपालांकडे तक्रार करणार आहे, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली. प्रजासत्ताकाची गळचेपी करणाऱ्या या सरकारला उद्याचा प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा नैतिक अधिकार नाही, असा हल्लाबोलही त्यांनी सरकारवर केला.

Web Title: Opposition Leader Wicha-Patil's secretariat police's official residence!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.