शिवसेनेचं चाललंय काय? पंतप्रधानांना पाठवलेल्या 'त्या' पत्रावर मुख्यमंत्री ठाकरेंची स्वाक्षरीच नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 04:35 PM2022-04-18T16:35:48+5:302022-04-18T16:44:52+5:30
मोदी सरकारवर सातत्यानं टीका करणाऱ्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांची पत्रावर स्वाक्षरीच नाही; १३ प्रमुख नेत्यांच्या पत्रावर सह्या
मुंबई: देशातील हिंसाचाराच्या वाढत्या घटनांवरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. देशात घडणाऱ्या हिंसाचाराच्या घटनांबद्दल विरोधी पक्षातील नेत्यांची चिंता व्यक्त करणारं पत्र दोनच दिवसांपूर्वी मोदींना पाठवलं. या पत्रावर अनेक मुख्यमंत्र्यांसह महत्त्वाच्या नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. मात्र मोदी सरकारला सातत्यानं टीका करणाऱ्या शिवसेनेचे पक्ष प्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंची स्वाक्षरी नाही. त्यामुळे शिवसेना संभ्रमात आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
देशात धार्मिक विषयांवरून हिंसाचाराच्या अनेक घटना घडत आहेत. मात्र यावर पंतप्रधानांनी मौन बाळगलं आहे. सत्ताधाऱ्यांकडून सामाजिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न सुरू आहेत, असं विरोधकांनी पत्रात नमूद केलं आहे. पंतप्रधान मोदींना १३ नेत्यांकडून संयुक्त पत्र पाठवण्यात आलं आहे. त्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, भाकपचे महासचिव सीताराम येचुरी, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्यासह महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे.
मोदी सरकारवर सातत्यानं टीकेचे बाण सोडणाऱ्या शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी मात्र पंतप्रधान मोदींना विरोधकांकडून पाठवण्यात आलेल्या पत्रावर स्वाक्षरी केलेली नाही. या संदर्भात शरद पवारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चर्चा केल्याचं समजतं. मात्र त्यानंतरही ठाकरेंनी पत्रावर स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे ठाकरेंच्या स्वाक्षरीशिवाय मोदींना पत्र पाठवण्यात आलं. या पत्रावर स्वाक्षरी केल्यास हिंदू मतं फुटतील अशी भीती शिवसेनेला वाटत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
विशेष म्हणजे भाजपविरोधात आघाडी करण्यासाठी भाजपची सत्ता नसलेल्या सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या मुंबईत बैठक घेण्याची तयारी शिवसेनेकडून सुरू आहे. भाजपेतर पक्षांच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच मुंबईत भेट होऊ शकते, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात ममता बॅनर्जींनी भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना एक पत्रदेखील लिहिलं आहे.