आमदार पास्कल धनारेंचा बुलेट ट्रेनला विरोध
By admin | Published: June 27, 2017 02:59 AM2017-06-27T02:59:59+5:302017-06-27T02:59:59+5:30
बुलेटट्रेन प्रकल्पासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी देण्यास भाजपाचेच आमदार पास्कल धनारे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
सुरेश काटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तलासरी : बुलेटट्रेन प्रकल्पासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी देण्यास भाजपाचेच आमदार पास्कल धनारे यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.
केंद्रशासित दादरा नगर हवेली व गुजरात राज्याच्या सीमांना भिडलेल्या आदिवासी बहुल तलासरी तालुक्यातून आता पर्यंत रिलायन्स गॅस लाईन, सहा पदरी महामार्ग, समुद्री मार्ग, सुपर एक्स्प्रेस हायवे, उच्च दाबाच्या विद्युतवाहिन्या साकारल्या. या सर्वांसाठी आदिवासींच्या जमिनी मातीमोल भावाने घेण्यात आल्या आहेत, आणि आता पंतप्रधान मोदी यांनी बुलेट ट्रेन हा महत्वकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून त्या साठी शेतकऱ्याच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी सर्व्हे सुरू आहे
डहाणू विधानसभा मतदार संघाचे आमदार पास्कल धनारे यांनी आपल्याच सरकारच्या विरोधात दंड थोपटले असून बुलेट ट्रेनला विरोध दर्शविला आहे आणि त्यांच्या या विरोधाला तलासरी भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीने देखील पाठींबा दिला आहे.
शेतकऱ्याची बाजू घेऊन आपल्याच सरकारच्या विरोधात पाऊल उचलल्याने आदिवासी शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. अनेक प्रकल्पासाठी तलासरी तालुक्यातील आदिवासींच्या जमिनी घेऊन त्याला भूमिहीन केले आहे अन आता बुलेट ट्रेन साठीही आदिवासी शेतकर्याची जमीन घेऊन त्याला देशोधडीला लावणार असाल तर अशा प्रकल्पाची गरजच काय आहे, आदिवासींना उध्वस्त करून सरकार कोणाचा विकास करू पाहते आहे अशी संतप्त प्रतिक्रियाही पास्कल धनारे यांनी व्यक्त केली आहे. पक्षाचे तालुका अध्यक्ष विनोद मेढा, पक्षाचे नेते लक्ष्मण वरखंडे, लुईस काकड, सुरेंद्र निकुंभ, यांनीही बुलेट ट्रेनला विरोध करून आदिवासी शेतकऱ्याच्या बाजूने आंदोलनात उतरण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उभे राहीले आहे.