महापालिकेच्या करवाढीला सर्वपक्षीय विरोध
By Admin | Published: February 25, 2015 02:27 AM2015-02-25T02:27:05+5:302015-02-25T02:27:05+5:30
महापालिकेने मालमत्ता करात समाविष्ट असलेल्या जललाभ, हस्तांतरण, मलनि:सारण करात सुमारे ५ ते ७ टक्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला
ठाणे : महापालिकेने मालमत्ता करात समाविष्ट असलेल्या जललाभ, हस्तांतरण, मलनि:सारण करात सुमारे ५ ते ७ टक्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच घरगुती पाणी वापराच्या आकरात, शहर विकास विभाग, घनकचरा सेवा शुल्क, जाहीरातदर, आदींमध्ये करवाढ, दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या संदर्भातील प्रस्ताव बुधवारी महासभेच्या पटलावर आले आहेत. परंतु या करवाढीला लोकशाही आघाडीने विरोध केला आहे. तर शिवसेनेने सर्वसामान्यांना त्रास होईल असा कोणताही निर्णय न घेण्याची भूमिका घेतली आहे.
मालमत्ताकरात समाविष्ट असलेल्या जललाभ कर, मलनि:सारण आणि हस्तांतरण करात ५ ते ७ टक्यांची वाढ सुचविली आहे. या करवाढीमुळे पालिकेचे उत्पन्न २५ ते ३० कोटींनी वाढणार आहे. तसेच घरगुती पाणी वापराच्या आकारातही वाढ होणार आहे. झोपडपट्टीसाठी ही दरवाढ ३० रुपयांची असेल. सदनिकांमध्ये राहणाऱ्यांसाठी ही दरवाढ चौरसफुटा प्रमाणे असणार आहे.
याशिवाय शहर विकास विभाग, घनकचरा सेवा शुल्क, जाहिरात दर यांमध्ये देखील महापालिकेने वाढ करण्याचे निश्चित केले आहे. परंतु याला आता लोकशाही आघाडीने विरोध दर्शविला असून विकासाची कोणतीही कामे नसताना केवळ करवाढ करून काय उपयोग, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. करवाढीला विरोध करण्याची भूमिका काँग्रेसने घेतली आहे. दरम्यान दुसरीकडे मनसे देखील या करवाढीला विरोध केला आहे. त्यामुळे सर्वांचेच लक्ष महासभेकडे आहे. (प्रतिनिधी)