विभाजनास संमेलनाध्यक्षांचा विरोध
By admin | Published: April 10, 2016 02:56 AM2016-04-10T02:56:27+5:302016-04-10T02:56:27+5:30
विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. मात्र स्वतंत्र राज्याची मागणी करणाऱ्यांचा मी तिरस्कार करतो, असे प्रतिपादन
धुळे : विदर्भ, मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी प्रयत्न करत आहेत. मात्र स्वतंत्र राज्याची मागणी करणाऱ्यांचा मी तिरस्कार करतो, असे प्रतिपादन ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले आहे. शनिवारी येथे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या भाषणात सबनीस यांनी महाराष्ट्राच्या विभाजनास विरोध असल्याची भूमिका घेतली.
हल्ली सर्वच राजकीय पक्षांमध्ये असहिष्णुतेचे वातावरण तयार झाले आहे. माझ्या भूमिकेकडे देवेंद्र फडणवीस सरकारने लक्ष द्यावे, असेही सबनीस म्हणाले.
खान्देशवासीयांना अद्याप कणखर नेतृत्व न मिळाल्याने त्यांना अन्यायच सहन करावा लागला आहे. खान्देशच्या विकासासाठी येथील मातीतीलच मुख्यमंत्री हवा. माजी मंत्री रोहिदास पाटील यांना राजकारणाचा चांगला अनुभव आहे. त्यामुळे त्यांना भविष्यात मुख्यमंत्रिपद मिळाले तर ते चांगल्या प्रकारे नेतृत्व करू शकतात, असे मत सबनीस यांनी मांडले. मात्र, संधी मिळून त्यांनी त्याचा चांगला उपयोग केला नाही, तर याच सभागृहात येऊन त्यांचा मी निषेध नोंदवील, असेही ते म्हणाले.
सबनीस यांनी आ. कुणाल पाटील यांनाही चांगले राजकारण करण्याचा कानमंत्र दिला. सबनीस यांनी अहिराणी भाषेत भाषणाची सुरुवात केली. परंतु, त्यांना या काही ओळी जगदीश देवपूरकर यांनी लिहून दिल्याचे ते म्हणाले.
पुढाऱ्यांसारखे खोटे बोलता येत नसल्याचे सांगून इमानदारीने मत मांडत असल्याचे त्यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)
सहावे अधिवेशन चाळीसगावला
चाळीसगावचे आ. उन्मेष पाटील यांनी सहावे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन चाळीसगाव येथे घेण्याची घोषणा केली. खान्देश विकास प्रतिष्ठानतर्फे शनिवारपासून दोन दिवसीय संमेलनाला सुरुवात झाली. उद्घाटनाच्या कार्यक्रमास रसिक वाचकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.