INDIAची मुंबईतील बैठक लांबणीवर? आता ‘ही’ तारीख ठरली; नेमके कारण काय? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 08:37 PM2023-08-04T20:37:46+5:302023-08-04T20:41:40+5:30
इंडिया आघाडीची मुंबईत होणारी बैठक पुढे ढकलण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
INDIA Meeting in Mumbai: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला चितपट करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांनी INDIA नावाची आघाडी केली आहे. भाजपप्रणित NDA ने लोकसभा निवडणुकांची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीएमधील खासदारांची बैठक घेतली होती. विरोधकांच्या आघाडीची पुढची बैठक मुंबईत होत असून, या बैठकीच्या तारखेत बदल झाल्याची माहिती देण्यात येत आहे.
इंडिया आघाडीची मुंबईतील बैठक २५ आणि २६ ऑगस्ट रोजी होणार होती. मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. काही नेत्यांनी ऑगस्ट महिन्यात उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. या नेत्यांमध्ये शरद पवारांचा समावेश असल्याची माहिती समोर आली होती. १६ ऑगस्ट रोजी शरद पवार राज्यव्यापी दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे २५ आणि २६ ऑगस्ट रोजी शरद पवार मुंबईत उपलब्ध असू शकणार नाही, असे म्हटले जात आहे.
इंडिया आघाडीची पुढील बैठक कधी होणार?
२६ पक्षांच्या विरोधी आघाडी असलेल्या 'इंडिया'ची पुढील बैठक ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात येत आहे. इंडिया आघाडीने यापूर्वी सांगितले होते की, या बैठकीत ते आघाडीची समन्वय समिती, संयुक्त सचिवालय आणि इतर पॅनेलसाठी नावे निश्चित करण्यात येणार आहेत. इंडिया आघाडीची मुंबईतील बैठकीचे आयोजन शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे करणार आहेत. या बैठकीत प्रचार, प्रसारमाध्यमे आणि आंदोलनासाठी इंडिया आघाडीकडून समित्या स्थापन करण्यात येतील.
दरम्यान, मुंबईत ११ सदस्यीय समन्वय समिती स्थापन केली जाईल. प्रचार व्यवस्थापन आणि संयुक्त रॅली आणि कामकाजासाठी केंद्रीय सचिवालय स्थापन केले जाईल. ११ सदस्यीय समन्वय समिती सर्व पक्षांचे प्रतिनिधी असतील. यांच्याद्वारे संवादाचे मुद्दे, संयुक्त रॅली, जागावाटप आणि विरोधी आघाडीच्या अशा इतर बाबींसह निवडणूक आणि राजकीय रणनीतीची भविष्यातील वाटचाल ठरवली जाईल. मुंबईच्या बैठकीत आघाडी अध्यक्षाची निवड करण्यात येईल, असे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बंगळुरू बैठकीनंतर सांगितले होते.