बलात्काराला विरोध केल्याने हत्या
By admin | Published: January 28, 2017 03:23 AM2017-01-28T03:23:16+5:302017-01-28T03:23:16+5:30
घरात एकट्या असलेल्या कामगार महिलेने बलात्काराला विरोध केला, म्हणून सुपरवायझरने तिची हत्या केल्याची बाब कुर्ल्यात उघडकीस आली
मुंबई : घरात एकट्या असलेल्या कामगार महिलेने बलात्काराला विरोध केला, म्हणून सुपरवायझरने तिची हत्या केल्याची बाब कुर्ल्यात उघडकीस आली आहे. गळा दाबून त्यानंतर तिच्या हाताची नस कापण्यात आली. आरोपीने घरात चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचे दाखवून, स्वत:च तक्रारदार म्हणून हजर झाला. मात्र, व्ही. बी. नगर पोलिसांनी अवघ्या काही तासांत त्याचे बिंग उघडकीस आणले. हरेराम ओमप्रकाश गुप्ता (३४) असे सुपरवायझरचे नाव असून, त्याला ताब्यात घेत अधिक तपास सुरू आहे.
मूळची मध्य प्रदेश येथील रहिवासी असलेली महिला सहा महिन्यांपूर्वीच कामानिमित्त मुंबई आली होती. कुर्ला पश्चिम येथील एचडीआयएल कोहिनूर सिटी परिसरात सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकाम साइटवर ती मजूर म्हणून काम करत होती. बुधवारी सकाळच्या सुमारास तिचा घरात मृतदेह सापडला. गुप्ता याने दिलेल्या माहितीवरून व्ही. बी. नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक तपासात चोरीच्या उद्देशाने महिलेवर बलात्कार करून, तिची हत्या करण्यात आल्याचे दिसून आले. तपास अधिकारी गणेश मोहिते यांनी अधिक तपास सुरू केला. तपासादरम्यान गुप्ताने दिलेल्या माहितीचा पोलिसांना संशय आला. गुप्ताच्या जबाबानुसार, सकाळच्या सुमारास महिलेचा दरवाजा दोन इंच उघडा दिसला. तिला आवाज देण्यासाठी आत डोकावून पाहिले, तेव्हा तिचा मृतदेह आढळून आल्याचे सांगितले होते.
मात्र, मोहिते यांच्या तपास पथकाने सुरुवातीलाच घराच्या दरवाजाची स्थिती ओळखली होती. दरवाजा एकतर पूर्ण उघडा होत असे, अथवा बंद. त्यामुळे गुप्ता पोलिसांची दिशाभूल करत असल्याचे मोहितेंनी ओळखले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच, गुप्ताने गुन्ह्याची कबुली दिली आहे. (प्रतिनिधी)