विरोधक आणणार विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वासाचा ठराव
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 03:29 PM2018-03-05T15:29:42+5:302018-03-05T15:29:42+5:30
विधानसभा अध्यक्षांचं वर्तन पक्षपाती आणि नियमबाह्य, आपल्या वर्तनाने त्यांनी या सभागृहाचा विश्वास गमावला आहे
मुंबई : विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याविरोधात विरोधी पक्ष अविश्वास ठराव आणणार आहे. विधानसभा अध्यक्षांचं वर्तन पक्षपाती आणि नियमबाह्य असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे, आपल्या वर्तनाने त्यांनी या सभागृहाचा विश्वास गमावला आहे, त्यामुळे त्यांना अध्यक्षपदावरून दूर करावे असा प्रस्ताव विरोधकांनी दाखल केला आहे.
यापूर्वी, विरोधकांनी आज मंत्रालयात पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. अध्यक्ष विरोधी पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं ऐकून घेत नाहीत, प्रश्नांना नीट उत्तर देत नाही. आज राज्यपाल अभिभाषणवर आणि इतर मुद्द्यांवर चर्चा होणार होती, पण कोणतीही चर्चा झाली नाही. प्रश्न विचारण्याची परवानगी देण्यात आली नाही, असा आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. तर, ‘गेले दोन दिवस सरकारी पक्षाकडून सभागृहाचं कामकाज होऊ दिलं जात नाही. सरकार विरोधी पक्षाच्या प्रश्नांना नीट उत्तर देत नाही. राज्यपाल अभिभाषणवर उत्तरही न देता विधानसभा अध्यक्षांनी मतदान घेऊन टाकलं त्यामुळे ही घटनेची पायमल्ली आहे. सभागृहात चर्चा होऊ द्यायची नाही. अशी सरकारची भूमिका दिसते. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांच्या सदस्यांनी त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणायचं ठरवलं आहे.’ असं विधानसभेतील विरोधी पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.