रिक्षा संघटनांचा हकिम समिती बरखास्तीला विरोध
By admin | Published: May 25, 2015 03:55 AM2015-05-25T03:55:42+5:302015-05-25T03:55:42+5:30
रिक्षा-टॅक्सींचे दरवर्षी नवीन भाडे ठरविणारी हकिम समिती शासनाकडून बरखास्त करण्यात आली. मात्र या निर्णयाला रिक्षा संघटनांचा विरोध असून
मुंबई : रिक्षा-टॅक्सींचे दरवर्षी नवीन भाडे ठरविणारी हकिम समिती शासनाकडून बरखास्त करण्यात आली. मात्र या निर्णयाला रिक्षा संघटनांचा विरोध असून यासंदर्भात सोमवारी आंदोलनाची भूमिका जाहीर करण्यात येणार आहे. टॅक्सी संघटनांचा मात्र विरोध मावळला
असून नविन समितीच्या शिफारशींनंतर पुढील भूमिका घेण्याचा निर्णय घेतला.
हकिम समितीच्या शिफारशीनुसार यंदा रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात एक रुपया वाढ करण्यात आली आहे. मात्र यावर न्यायालयाकडून अद्याप शिक्कामोर्तब झालेले नाही. तरीही १ जूनपासून भाडेवाढ लागू केली जाणार आहे. परंतु शासनाच्या परिवहन विभागाकडून हकिम समिती बरखास्त करुन नवीन त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. हकिम समितीमुळे तीन वर्षांत ५0 टक्के जादा भाडे प्रवाशांवर लादण्यात आल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले होते.
हकिम समिती बरखास्तीच्या निर्णयाला रिक्षा संघटनांनी विरोध केला आहे. सोमवारी या संदर्भातील भूमिका जाहीर केली जाणार असल्याचे मुंबई आॅटोरिक्षामेन्स युनियनचे अध्यक्ष शशांक राव
यांनी सांगितले. राज्यातील सर्व रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठक होईल. त्यानंतर पुढील आंदोलनासंदर्भात निर्णय जाहीर करू, असे राव म्हणाले. (प्रतिनिधी)