विरोधकांकडे शत्रू म्हणून पाहू नये - पवार
By admin | Published: February 22, 2016 01:15 AM2016-02-22T01:15:47+5:302016-02-22T01:15:47+5:30
राजकारणात पक्षीय मतभेद असतात, पण सुसंस्कृतपणा आणि सभ्यता नसेल तर समाजकारण करता येत नाही. समाजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर सामान्य माणसाच्या बांधिलकीशी
पुणे : राजकारणात पक्षीय मतभेद असतात, पण सुसंस्कृतपणा आणि सभ्यता नसेल तर समाजकारण करता येत नाही. समाजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर सामान्य माणसाच्या बांधिलकीशी तडजोड करू नये. राजकारणात विरोधकांकडे कधीही शत्रू म्हणून पाहू नये, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
पुणे महानगरपालिकेतर्फे शरद पवार यांचा रविवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे अमृतमहोत्सवानिमित्त मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. पवार म्हणाले, संसदीय लोकशाहीमध्ये राजकारणातील सुसंस्कृतपणा महत्त्वाचा आहे. आम्ही संसदेत भांडतो; पण राष्ट्र आणि समाजहिताच्या प्रश्नावर सर्व जण एकत्र येतो. पुणे महापालिकेतही हे पाळले जात असल्याचे पाहिले आहे. राजकारणामध्ये लोकांशी बांधिलकी ठेवली पाहिजे. पुण्यातील राजकारणामध्ये नानासाहेब गोरे, जयंतराव टिळक, एस. एम. जोशी यांची भाषणे ऐकून आपण राजकारण आणि समाजकारण कसे करायचे याचा आदर्श घेतला. पुण्यातूनच राजकीय जीवनात प्रवेश केला. यश-अपयशातील प्रत्येक क्षणी शहराने मला प्रोत्साहित केले. त्यामुळे या सत्कारानिमित्त मी पुणेकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.
‘देशामधील काही राज्यांत राजकीय सभ्यता पाहायला मिळत नाही. ही एक प्रकारची राजकीय असहिष्णुताच आहे. त्यासाठी चांगल्या लोकांनी राजकारणात आले पाहिजे. पवारांचा कामातील उत्साह आजही कायम आहे. आमचे सरकार असले तरी त्यांचे मार्गदर्शन जरूर हवे आहे,’ असे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले. पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, राजकीय जीवनामध्ये विचारांची लढाई होते, पण सध्या वेगळी संस्कृती येऊ पाहत आहे. त्यामुळे राजकीय वातावरण गढूळ होत असून, ही खरी राजकीय अस्पृश्यता आहे. बहुजन समाजातील एक नेता एवढा मोठा होतो, हा पुण्याचा आणि महाराष्ट्राचा सन्मान असल्याचे शिंदे यांनी सांगितले. पवारांचा सर्वच क्षेत्रात वावर असून, ते आमच्यासाठी एका दीपस्तंभासारखे असल्याचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी सांगितले. आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते उल्हास पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)