एकनाथ शिंदे जर त्यांच्या नातेवाईकाला तिकीट देणार असतील तर...; रामदास कदम थेट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2024 11:49 AM2024-10-01T11:49:41+5:302024-10-01T11:50:06+5:30
येत्या विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी तिकिटासाठी पक्षाकडे मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यात शिवसेनेत गुहागर मतदारसंघावरून अंतर्गत वाद होण्याची चिन्हे आहेत.
खेड - विपुल कदम कोण?, त्यांचा गुहागर मतदारसंघाशी संबंध काय असा सवाल शिवसेना नेते रामदास कदम यांनी उपस्थित केला आहे. श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांना गुहागर मतदारसंघाची उमेदवारी मिळणार अशी चर्चा माध्यमांमध्ये सुरू होती. त्या चर्चेवर रामदास कदमांनी थेट भाष्य केले आहे. विपुल कदम यांना उमेदवारी कशी मिळते हा मोठा प्रश्न असल्याचं कदमांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना रामदास कदम म्हणाले की, एकनाथ शिंदे किंवा त्यांचे चिरंजीव हे आपल्या जवळचा नातेवाईक म्हणून तिकीट देणार असतील, नवीन प्रथा शिवसेनेत पाडणार असतील तर ते शिवसैनिकांना भावेल असं वाटत नाही. शिवसैनिकांनी वर्षानुवर्षे रात्रंदिवस काम केले आहे. त्याठिकाणी गुहागरमध्ये आपला नातेवाईक आणून त्याला उमेदवारी द्यायची असं जर केले तर त्यांना १०० टक्के पराभवाला सामोरे जावे लागेल. त्यासाठी कुठल्याही जोशी नावाच्या ब्राह्मणाकडे जाऊन बघण्याची आवश्यकता नाही असं रामदास कदमांनी म्हटलं आहे.
तसेच गुहागर मतदारसंघात जर त्याला उमेदवारी दिली तर माझा काडीचाही संबंध नसेल. मी गुहागर मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचारासाठी पाय ठेवणार नाही असं स्पष्ट मत शिवसेना नेते रामदास कदमांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे शिवसेनेत उमेदवारीवरून संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत गुहागर मतदारसंघातून श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावरूनच रामदास कदमांनी त्यांची भूमिका मांडली आहे.
गुहागर मतदारसंघात विपुल कदम सक्रीय
खासदार श्रीकांत शिंदे यांचे मेहुणे विपुल कदम हे गुहागर विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. रविवारी वर्षा बंगल्यावर झालेल्या मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत विपुल कदम यांचं नाव पुढे आले. विपुल कदम हे गुहागर मतदारसंघात सक्रीयही झाले आहेत. त्यांनी अलीकडेच धर्मवीर २ या सिनेमाचं मोफत शो मतदारसंघात आयोजित केले. शहरात विविध ठिकाणी विपुल कदम यांच्याकडून बॅनरबाजी करण्यात येत आहे. त्यामुळे विपुल कदम गुहागर मतदारसंघात लढतील असं बोललं जाते.
गुहागरमध्ये सध्या विद्यमान आमदार भास्कर जाधव असून ते उद्धव ठाकरे गटात आहेत. विपुल कदम यांना रिंगणात उतरवल्यास त्यांना भास्कर जाधवांशी मुकाबला करावा लागेल. भास्कर जाधवांसारखा आक्रमक चेहरा असताना विपुल कदम यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक असेल. त्यातच रामदास कदमांनी विपुल कदमांच्या नावाला विरोध करत जर त्यांना उमेदवारी दिली पराभव निश्चित असल्याची भविष्यवाणीही वर्तवली त्यामुळे या मतदारसंघातील उमेदवारीवरून रामदास कदम आणि एकनाथ शिंदे यांच्यात वाद निर्माण होणार का हे आगामी काळात कळेल.