तिहेरी तलाकला मौलानांचा विरोध
By admin | Published: May 11, 2017 02:22 AM2017-05-11T02:22:48+5:302017-05-11T02:22:48+5:30
मुस्लीम समाजातील तीन तलाक आणि हलाला परंपरेविरोधात इंडियन मुस्लीम फॉर सेक्युलर डेमोक्रसी संघटनेने मोहीम सुरू केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुस्लीम समाजातील तीन तलाक आणि हलाला परंपरेविरोधात इंडियन मुस्लीम फॉर सेक्युलर डेमोक्रसी संघटनेने मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला सोलापूरचे मौलाना सय्यद शहाबुद्दीन सल्फी फिरदौसी यांनी उघड पाठिंबा दिला आहे. या परंपरांविरोधात मुस्लीम समाजातील विविध संघटना पुढे येत असल्या, तरी अद्याप मौलानांकडून अशाप्रकारे पाठिंबा देण्याची ही पहिलीच वेळ असल्याची चर्चा आहे. संघटनेचे निमंत्रक जावेद आनंद यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचे एक संविधानिक खंडपीठ या प्रकरणी ११ ते १९ मे दरम्यान सुनावणी घेणार आहे. या सुनावणीअंती मुस्लीम पर्सनल लॉमुळे महिला-पुरुषांना समान अधिकार मिळण्याची अपेक्षा आहे. मुळात ही पद्धत कुराणविरोधी असल्याचा दावाही त्यांनी या वेळी केला आहे. मुस्लीम समाजातील अनेक नागरिकांना ही पद्धत मान्य नाही. मात्र, उघडपणे ते तीन तलाक आणि हलाला पद्धतीचा विरोध करण्यास धजावत नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.
तरी सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीपर्यंत अधिकाधिक नागरिकांनी या गोष्टीला जाहीर निषेध आणि विरोध नोंदवण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. मुळात तीन तलाक ही
पद्धत धर्मग्रंथाची टिंगल
उडवणारी असून, हलाला पद्धतीमुळे मुस्लीम स्त्रियांच्या अब्रूवरच घाला घातला जात असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.