चुकीच्या परंपरेला विरोध
By admin | Published: February 29, 2016 04:13 AM2016-02-29T04:13:31+5:302016-02-29T04:13:31+5:30
समाजात असलेल्या चुकीच्या परंपरेला आमचा विरोध आहे. आम्ही सुरू केलेला लढा हा स्त्री-पुरुष समानतेचा आहे. तो कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, असे मत भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई
लातूर : समाजात असलेल्या चुकीच्या परंपरेला आमचा विरोध आहे. आम्ही सुरू केलेला लढा हा स्त्री-पुरुष समानतेचा आहे. तो कुठल्याही धर्माच्या विरोधात नाही, असे मत भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी लातुरात रविवारी प्रबोधन मेळाव्यात मांडले.
येथील ‘दयानंद’च्या सभागृहात अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने आयोजित मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, शनिशिंगणापूर येथील शनि देवाच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा, यासाठी हे आंदोलन सुरू आहे. २१ व्या शतकात महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. मात्र शनिशिंगणापूरच्या चौथऱ्यावर शनि देवाच्या दर्शनासाठी महिलांना जाणीवपूर्वक प्रवेश नाकारला जात आहे. यातून महिलांना दुय्यम स्थान देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. देशातील प्रत्येक मंदिरात महिलांनाही पूजा आणि अभिषेकाचा अधिकार मिळाला पाहिजे.
स्त्री-पुरुष समानतेसाठी हे आंदोलन सुरू आहे. घटनेने दिलेला समानतेचा अधिकार महिलांनाही मिळाला पाहिजे. हे आंदोलन देव आणि धर्माच्या विरोधात नाही. समतेसाठी हा सुरू असलेला आमचा लढा असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.