राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांचा पहिल्यांदाच बहिष्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 05:27 AM2019-02-26T05:27:22+5:302019-02-26T05:27:24+5:30
संघाच्या अजेंड्याचा आरोप : घोषणाबाजीने विधानभवन दणाणून सोडले
मुंबई : विधिमंडळाच्या इतिहासात राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधी पक्षांनी सोमवारी पहिल्यांदाच बहिष्कार टाकला. राज्यपाल हे पद घटनात्मक असताना राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक असल्याची भूमिका काही दिवसांपूर्वी मांडली होती. त्यामुळे त्यांचे अभिभाषण हे राज्यपाल म्हणून राज्याच्या हिताचे असेल की संघाचा कार्यकर्ता म्हणून संघाचा अजेंडा राबवणारे?, याबाबत शंका असल्याने अभिभाषणावर बहिष्कार घालत असल्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले.
यापूर्वी अभिभाषणावेळी विरोधकांनी घोषणाबाजी करणे, गोंधळ घालणे असे प्रकार घडले होते. अभिभाषणाला सुरुवातीला उपस्थित राहून नंतर सभात्याग केल्याचीही उदाहरणे आहेत पण आज विरोधकांनी या अभिभाषणावर बहिष्कार टाकला.
गांधी हम शर्मिंदा है तेरे कातिल जिंदा है... आरएसएसचं समर्थन करणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असो... अशा घोषणा देत राष्ट्रवादी व आघाडीतील पक्षाच्या आमदारांनी विधानभवन दणाणून सोडले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नसीम खान, जितेंद्र आव्हाड, प्रा.जोगेंद्र कवाडे, हेमंत टकले, शशिकांत शिंदे आदी त्यात सहभागी झाले.
३.३६ लाख कोटींची चार वर्षांत गुंतवणूक
राज्यात राबविलेली उद्योगभिमुख धोरणे, मेक इन इंडियांतर्गत मॅग्नेटिक महाराष्ट्रचे आयोजन याद्वारे चार वर्षांत ३.३६ लाख कोटींची विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात झाली, असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी सोमवारी केलेल्या अभिभाषणात सांगितले.