..तर अडीच लाख शेतकरी कर्जमाफीचे लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2017 12:05 AM2017-06-06T00:05:09+5:302017-06-06T00:10:28+5:30
परभणी जिल्ह्यात २ लाख ५७ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार परभणी जिल्ह्यात २ लाख ५७ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो.
राज्यातील ५ एकरपर्यंत शेत जमीन असलेल्या अल्पभूधारक आणि थकित कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४ जून रोजी केली आहे. तसेच ३१ आॅक्टोबरपूर्वी कर्जमाफी अंमलात आणली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनुसार परभणी जिल्ह्यात अडीच लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. जिल्ह्यात एकूण ३ लाख ४७ हजार ९१८ शेतकरी आहेत. त्यापैकी ० ते १ हेक्टर जमीन असलेले १ लाख ३० हजार ७४ शेतकरी असून १ ते २ हेक्टर जमीन असलेल्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख २६ हजार ९२७ एवढी आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये अल्पभूधारक असलेल्या शेतकऱ्यांची संख्या २ लाख ५७ हजार एवढी असून ९० हजार ९१७ शेतकरी बहुभूधारक आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेप्रमाणे अडीच लाख शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ मिळू शकतो. जिल्ह्यातील ८४८ गावांमधून शेतकऱ्यांनी खरीप व रबीच्या पेरण्यांसाठी बँकेमार्फत पीक कर्ज घेतले आहे. दरम्यान, अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या उपलब्ध असली तरी या शेतकऱ्यांनी किती रुपयांचे कर्ज घेतले आणि कर्जमाफीची रक्कम किती होते, याचा लेखाजोखा तयार करण्याचे काम बँक प्रशासनामार्फत केले जात आहे.
एकंदर मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचा जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना लाभ मिळू शकतो, हे मात्र स्पष्ट झाले आहे.