Rain: ऑरेंज अलर्टचा मुंबईकरांना चकवा; पावसाचा जोर कोकणातही ओसरला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 06:57 AM2021-06-14T06:57:20+5:302021-06-14T06:57:29+5:30
रविवारी सकाळी ८ पर्यंत आलेल्या नोंदीनुसार, कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडला.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई/पुणे : मुंबईत ९ जून रोजी झालेल्या अतिवृष्टीनंतर पुढील तीन दिवस हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकणात रेड अलर्ट जाहीर केला. त्यानंतर रविवारी त्यात बदल करून ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला. मात्र, इशाऱ्याबरहुकूम मुंबई, कोकणातील बहुतांश ठिकाणी पाऊस न झाल्याने हा अलर्ट नागरिकांसाठी होता की पावसासाठी, अशी गमतीदार चर्चा नागरिकांमध्ये रंगली.
रविवारी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. आता, हवामान विभागाने उद्या, सोमवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत ‘रेड ॲलर्ट’ दिला असून, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा इशारा रविवारी दिला. त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांतील ‘येलो अलर्ट’ मागे घेतला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात रविवारी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल, असा इशारा होता. प्रत्यक्षात सकाळपासून सायंकाळपर्यंत मुंबईकडे पावसाचे ढग आलेच नाहीत. शनिवारी मुंबईवर जमा झालेल्या ढगांनी आपला मोर्चा दक्षिणेकडे म्हणजे कर्नाटककडे वळविला. परिणामी, मुंबईवर असलेला ढगांचा काळोख नाहीसा झाला.
रविवारी दिवसभरात मुंबई ७, सांताक्रूझ ०.८, अलिबाग १०, रत्नागिरी १४, पणजी ३, महाबळेश्वर २, चंद्रपूर ९ मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत रत्नागिरी १५०, संगमेश्वर, देवरुख १३०, कानकोण १२०, माणगाव १०, कणकवली, मंडणगड, माथेरान, केपे, राजापूर, सांगे, सावंतवाडी ९०, हर्णे, लांजा ८० मिमी पावसाची नोंद झाली. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस झाला.
रविवारी सकाळी ८ पर्यंत आलेल्या नोंदीनुसार, कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण, गोवा, विदर्भात बहुतांश ठिकाणी, मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. कोकण, गोव्याच्या बहुतांश भागात आणि मध्य महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात कमाल तापमानात किंचित घट झाली.
आजचा इशारा
n पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांतील घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
n सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत ‘रेड अलर्ट’ दिला असून हिंगोली, नांदेड, भंडारा तसेच विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तविला आहे.