कॉलेजच्या चौकशीचे आदेश
By admin | Published: July 14, 2017 03:14 AM2017-07-14T03:14:00+5:302017-07-14T03:14:00+5:30
ओरिएंटल एज्युकेशन सोसायटीच्या सानपाडा येथील कॉलेजच्या चौकशीचे निर्देश तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : ओरिएंटल एज्युकेशन सोसायटीच्या सानपाडा येथील कॉलेजच्या चौकशीचे निर्देश तंत्रशिक्षण विभागाने दिले आहेत. त्यासाठी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. या समितीने महाविद्यालयाला भेट देऊन चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक प्रमोद नाईक यांनी दिले आहेत.
सानपाडा येथील ओरिएंटल कॉलेजमध्ये कनिष्ठ व पदवीपर्यंतचे अभ्यासक्रम घेतले जातात. तसेच बी.फार्मसी, एम.फार्मसी, बी.एड. व विधि महाविद्यालय चालविले जाते. विशेष म्हणजे ४000 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर उभारलेल्या एका सात मजली इमारतीतच हे सर्व अभ्यासक्रम घेतले जातात. अखिल भारतीय तंत्रशिक्षण संचालनालय व विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र इमारत असणे बंधनकारक आहे. तसेच महाविद्यालयातील सेमिनार रूम, लेक्चर रूम, लायब्ररी, प्रयोगशाळा व संगणक रूम नियमानुसार नसल्याचे दिसून आले आहे. महाविद्यालयात कर्मचारी वर्ग अपुरा आहे. हेल्थ केअरची सुविधा नाही. एकूणच महाविद्यालय व्यवस्थापनाने सर्व नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार मनविसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी संबंधित विभागाकडे केली होती. त्यानुसार तंत्रशिक्षण विभागाने या तक्रारीची दखल घेत महाविद्यालयाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यासाठी एस.बी. विश्वरूपे, डॉ. एम.डी. मेनन व एस.एस. मोतलिंग या तीन उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची समिती गठित केली आहे.
दरम्यान, मनविसेच्या एका शिष्टमंडळाने गुरुवारी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांची भेट घेऊन ओरिएंटल महाविद्यालयावर कारवाई करण्याची मागणी केली. कुलगुरू देशमुख यांनीसुद्धा यासंदर्भात समिती नियुक्त करून चौकशी केली जाईल, असे अश्वासन दिल्याचे मनविसेचे कळविले आहे. या मनविसेच्या या शिष्टमंडळात मनविसेचे शहराध्यक्ष सविनय म्हात्रे, मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे, मनविसेचे मुंबई विद्यापीठाचे उपाध्यक्ष संतोष गांगुर्डे, संदेश डोंगरे आदींचा समावेश होता.
महाविद्यालय व्यवस्थापनाने सर्व नियमांचे उल्लंघन केल्याची तक्रार मनविसेकडून करण्यात आली आहे.