जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश
By Admin | Published: November 5, 2016 04:42 AM2016-11-05T04:42:17+5:302016-11-05T04:42:17+5:30
भायखळा येथील राणीच्या बागेतील पेंग्विन मृत्यूप्रकरणी लोकायुक्तांच्या दरबारात शुक्रवारी सुनावणी झाली.
मुंबई : भायखळा येथील राणीच्या बागेतील पेंग्विन मृत्यूप्रकरणी लोकायुक्तांच्या दरबारात शुक्रवारी सुनावणी झाली. या वेळी विरोधी पक्षाच्या तक्रारीची गंभीर दखल घेत या प्रकरणात जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश लोकायुक्तांनी महापालिकेला दिले आहेत. तसेच लोकायुक्त पुढच्या आठवड्यात स्वत: या प्राणिसंग्रहालयाची झाडाझडती घेणार आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांसह शिवसेनेचेही धाबे दणाणले आहे.
पेंग्विन मृत्यूप्रकरणी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे, तर काँग्रेस पक्षाने लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. पेंग्विन आणण्यापासून ते
त्यांच्या देखभालीपर्यंतच्या सर्वच कामांमध्ये भ्रष्टाचार झाला
असून, अनेक नियमांचे उल्लंघन
झाले आहे; तर पेंग्विनचा मृत्यू राणीबागेतील असुविधांमुळेच झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यानुसार लोकायुक्त कार्यालयाने राणीबागचे उपअधीक्षक डॉ. संजय त्रिपाठी यांना समन्स बजावले होते. यावर शुक्रवारी सुनावणी झाली. यात पेंग्विन मृत्यूप्रकरणी जबाबदारी निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १५ नोव्हेंबरला होणार आहे. (प्रतिनिधी)