केमिकल फॅक्टरीत मोठ्या स्फोटाच्या शक्यतेने लगतचे वाघाडी गाव खाली करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 01:09 PM2019-08-31T13:09:04+5:302019-08-31T13:09:20+5:30
घटनेतील मृताची संख्या ११, जखमींची संख्या ४० पेक्षा जास्त
धुळे- जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावालगत असलेल्या येथे एका केमिकल फॅक्टरीत शनिवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटात ११ जण ठार तर सुमारे ४० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. वाघाडी-बाळदे रस्त्यावरील फॅक्टरीत झालेल्या या स्फोटाचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. फॅक्टरी जमिनीखाली असलेल्या टाकीचा मोठा स्फोट होण्याच्या शक्यतेने फॅक्टरीलगत असलेले वाघाडी गाव खाली करण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान घातपाताच्या शक्यतेने एटीएसचे पथक घटनास्थळी पोहचले असून नागरिकांना घटनास्थळी गर्दी न करण्याचे आवाहन शिरपूर नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.
मृत्यू झालेल्या सात जणांपैकी पाच जणांची ओळख पटली असून, दोन जणांची ओळख पटलेली नाही. त्यात एक पुरूष व एका मुलीचा समावेश आहे. तर सुमारे ४० जण जखमी झाले आहेत.
या स्फोटाच्या घटनेची झळ वाघाडी गावाला बसली असून फॅक्टरीत मोठा स्फोट होण्याच्या शक्यतेने हे गाव खाली करण्याचे आदेश प्रशासनाने दिले. त्यामुळे तेथील रहिवाशी ग्रामस्थांना अन्य सुरक्षित स्थळी हलविण्यात येत आहे. घटनेच्या ठिकाणी धुळे, शिरपूर व शहादा अग्निशमन बंब पोहचले असून फॅक्टरी परिसर व फॅक्टरीत स्फोटामुळे जळालेल्या साहित्यावर तसेच आग लागलेल्या ठिकाणी पाण्याचा मारा करण्यात येत आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे तसेच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे येथील उपसंचालक एम.एम. रत्नपारखी तातडीने घटनास्थळी पोहचले. परिस्थितीचा आढावा घेऊन उपाय योजले जात आहेत. अजून फॅक्टरीत मोठा स्फोट होण्याच्या शक्यतेने वाघाडी गाव खाली करण्याचे आदेश देण्यात आले. त्याची तत्परतेने अंमलबजावणी करण्यात येत आहे. दरम्यान, घटनास्थळी जमिनीखाली असलेल्या टाकीचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे या आपत्कालीन परिस्थितीत मदत कार्यात अडथळे येत आहेत. तरी नागरिकांनी रस्त्यावर व घटनास्थळ परिसरात येऊन गर्दी करू नये. आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी घरातच थांबावे, असे आवाहन शिरपूर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी केले आहे.