मध्यरात्रीपासून हॉटेलच्या बिलामध्ये होणार कपात, 5 टक्के जीएसटी लागू करण्याचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2017 06:37 PM2017-11-14T18:37:51+5:302017-11-14T19:20:16+5:30

सर्व हॉटेलचालकांना पाच टक्के जीएसटी आकारण्याचा आदेश देण्यात आला असून, त्यापेक्षा जास्त जीएसटी आकारल्यास कारवाई करण्याचा इशारा गिरीश बापट यांनी दिला आहे

The order to impose a 5 percent GST in hotels from midnight | मध्यरात्रीपासून हॉटेलच्या बिलामध्ये होणार कपात, 5 टक्के जीएसटी लागू करण्याचा आदेश

मध्यरात्रीपासून हॉटेलच्या बिलामध्ये होणार कपात, 5 टक्के जीएसटी लागू करण्याचा आदेश

googlenewsNext
ठळक मुद्देउद्या सकाळपासून हॉटेलमध्ये फक्त 5 टक्के जीएसटी आकारण्याच्या सूचना अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकारच्या हॉटेलना सरसकट 5 टक्के जीएसटी लागणार असल्याचं घोषित केलं होतंजास्त जीएसटी आकारल्यास कारवाई करण्याचा इशारा गिरीश बापट यांनी दिला आहेतक्रार करण्यासाठी सरकार हेल्पलाईन नंबर 1800225900 सुरू करणार आहे

मुंबई - सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवर आकारण्यात येणा-या जीएसटीमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा दिला. जीएसटीतील कपातीचा परिणाम हॉटेलच्या बिलावरही होणार आहे. जीएसटी लागू झाल्याने भरमसाट बिलामुळे त्रस्त झालेल्या सामान्यांना दिलासा मिळणार असून हॉटेलच्या बिलात आता कपात होणार आहे. कारण उद्या सकाळपासून हॉटेलमध्ये फक्त 5 टक्के जीएसटी आकारण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी ही माहिती दिली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व प्रकारच्या हॉटेलना सरसकट 5 टक्के जीएसटी लागणार असल्याचं घोषित केलं होतं. तातडीने या निर्णयाची अंमलबजावणी सुरु होणार आहे.

सर्व हॉटेलचालकांना पाच टक्के जीएसटी आकारण्याचा आदेश देण्यात आला असून, त्यापेक्षा जास्त जीएसटी आकारल्यास कारवाई करण्याचा इशारा गिरीश बापट यांनी दिला आहे. याआधी एसी हॉटेलमध्ये 18 टक्के आणि  नॉन-एसी हॉटेलमध्ये 12  टक्के जीएसटी आकारला जात होता. वेगवेगळ्या क्लासच्या हॉटेल्समध्ये जीएसटी वेगवेगळा असल्याने सर्वसामान्यांकडून टीका होत होती. हॉटेलमध्ये लागणार जीएसटी कमी करण्याची शिफारसही मंत्रिगटाने केली होती. 

गिरीश बापट यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'उद्यापासून हॉटेलमध्ये पाच टक्के जीएसटीची अंमलबजावणी होत आहे. व्हॅट कमी न करता जीएसटी लावत हॉटेलमालक आणि विक्रेते ग्राहकांची फसवणूक करत होते. मात्र उद्यापासून जे हॉटेलमालक दर कमी करणार नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी सरकार हेल्पलाईन नंबर 1800225900 सुरू करणार आहे'. 

'जुन्या मालावर नव्या दरानुसार स्टिकर लावण्यात यावेत. हॉटेल, मेडिकल दुकाने व इतर दुकाने याठिकाणी सरकारनं सुरु जीएसटीसाठी सुरु केलेल्या हेल्पलाइनचा नंबर दर्शनी भागात लावण्याचेही आदेश देण्यात आले आहेत', असा आदेशच गिरीश बापट यांनी दिला आहे. 

सर्वसामान्यांच्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवर आकारण्यात येणा-या जीएसटीमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय गुवाहाटी येथे झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला होता. 227 पैकी फक्त 50 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला होता. अन्य 177 वस्तू 28 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमधून 18 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे च्युईंगम ते डिटरजंटपर्यंत वस्तू स्वस्त झाल्या आहेत.  

विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधून दैनंदिन वापराच्या वस्तूंवर  28 टक्के जीएसटी आकारण्याला मोठा विरोध होता. त्यामुळे फक्त आलिशान, चैनींच्या 50 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे.  

1 जुलैपासून संपूर्ण देशभरात जीएसटीची अंमलबजावणी सुरु झाली आहे. 5, 12, 18 आणि 28 टक्के असे चार टॅक्स स्लॅब जीएसटीमध्ये आहेत. जुलै महिन्यात हा कर लागू झाल्यानंतर 227 वस्तू 28 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आहेत. ग्रेनाईट, दाढीचे सामान, सौंदर्य प्रसाधन, मार्बल, चॉकलेट, च्युविंग गम, शेव्हींग क्रिम आणखी स्वस्त होणार आहे. 
 

Web Title: The order to impose a 5 percent GST in hotels from midnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.