पेट्रोलिंग वाढवण्याचे आदेश

By admin | Published: January 29, 2017 01:29 AM2017-01-29T01:29:33+5:302017-01-29T01:29:33+5:30

दिव्यात थेट रुळांवरच आढळलेल्या रुळाच्या तुकड्याप्रकरणी दहशतवाद्यांचे कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी जवळपास दोन दिवस उलटून ठोस काही हाती

Order to increase petrol | पेट्रोलिंग वाढवण्याचे आदेश

पेट्रोलिंग वाढवण्याचे आदेश

Next

ठाणे : दिव्यात थेट रुळांवरच आढळलेल्या रुळाच्या तुकड्याप्रकरणी दहशतवाद्यांचे कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणी जवळपास दोन दिवस उलटून ठोस काही हाती लागत नसल्याने, शनिवारी रेल्वेचे अपर पोलीस महासंचालक डी. कनकरत्नम आणि रेल्वे पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी ठाण्यात धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, तसेच यामागचे नेमके कारण काय, याबाबत चर्चा करून, सुरक्षिततेसंदर्भात रेल्वेने दोन्ही दलांना आदेश दिले आहेत. याचदरम्यान, ठाणे शहर पोलिसांशी चर्चा करून, मदतीचा हात मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बुधवार, २५ जानेवारी रोजी मडगाव-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस दिवा स्थानक ाचे लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलट यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ वेळीच टळला. मात्र, यामागे घातपाती शक्यता वर्तवली जात असल्याने, राष्ट्रीय तपास संस्था व राज्य दहशतवादविरोधी पथकाने चौकशी सुरू केली आहे.
याबाबत, कोणतेही ठोस असे पुरावे किंवा काही हाती लागत नसल्याने, तपास धिमा होतो की काय, म्हणून रेल्वेचे अपर पोलीस महासंचालक आणि पोलीस आयुक्तांनी शनिवारी ठाण्यात धाव घेतली. हा प्रकार कुठे घडला, तेथे नेमके काय घडले, याचा इत्थंभूत अभ्यास करून, लोहमार्ग आणि रेल्वे सुरक्षा दल यांना समन्वयाने तपास करण्याचे आदेश देताना, रेल्वे ट्रॅकचे काम करणाऱ्या लोकांशी संपर्क वाढवावा, पेट्रोलिंग वाढवावी, पोलीसमित्रांची मदत घेऊन जनसंपर्क वाढण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)

ठाणे पोलिसांकडे मागितली मदत
रेल्वे पोलिसांनी ठाणे शहर पोलिसांकडे मदत मागितली आहे. शनिवारी
ठाण्यात झालेल्या चर्चेत, ठाणे शहर परिमंडळ उपायुक्त अभिषेक त्रिमुखी, वागळे इस्टेटचे सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले, ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एम. व्ही. धर्माधिकारी आदी उपस्थित होते. या वेळी या प्रकरणाबरोबर रेल्वे सुरक्षेसह पार्किंग या विषयावरही चर्चा झाली.

रेल्वेची तीन पथके
या प्रकरणामुळे रेल्वे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. कोणतेही धागेदोरे हाती लागत नाहीत, तसेच कोणीही पुढे येत नसल्याने आणि चौकशीत अद्यापही काही पुढे न आल्याने, रेल्वे पोलिसांची तीन पथके शोधकार्यासाठी तैनात केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नागरिकांना आवाहन
दिवा रेल्वे स्टेशनजवळ रुळांवरच आढळलेल्या भल्या मोठा रुळाचा तुकडा हा ज्या परिसरात टाकण्यात आला होता, हा रूळ टाकणाऱ्या किंवा संशयित व्यक्तीबाबत लोकांकडून काहीच माहिती मिळत नाही. दिव्यात काही संशयास्पद हालचाली आढळल्यास, नागरिकांनी ठाणे लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.

Web Title: Order to increase petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.