आरोग्य उपसंचालकांच्या पत्नीच्या चौकशीचे आदेश
By admin | Published: June 8, 2017 02:47 AM2017-06-08T02:47:52+5:302017-06-08T02:47:52+5:30
खासगी प्रॅक्टिस करीत असल्याची तक्रार: प्रतिनियुक्तीही अनावश्यक
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : आरोग्यसेवा अकोला मंडळाचे उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांच्या पत्नी डॉ. शुभांगी अंबाडेकर यांच्या अकोला जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातून यवतमाळ येथे झालेली प्रतिनियुक्ती व त्या खासगी प्रॅक्टिस करीत असल्याबाबतच्या तक्रारीची दखल घेत मुख्यमंत्री कार्यालयाने या प्रकाराची चौकशी करण्याचे आदेश आरोग्य संचालकांना दिले आहेत.
डॉ. शुभांगी अंबाडेकर या नेत्रतज्ज्ञ असून, त्यांची पदस्थापना अकोला जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात आहे. आॅगस्ट २०१६ मध्ये तत्कालीन आरोग्य उपसंचालक डॉ. अविनाश लव्हाळे यांच्या कार्यकाळात त्यांना यवतमाळ जिल्ह्यात प्रतिनियुक्ती देण्यात आली असून, त्या फिरत्या नेत्र पथकात नेत्रतज्ज्ञ वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सदर प्रतिनियुक्ती आवश्यकता नसताना देण्यात आली असून, डॉ. शुभांगी अंबाडेकर या कार्यालयीन वेळेत खासगी दवाखान्यात प्रॅक्टिस करीत असल्याची तक्रार यवतमाळ येथील स्वाभिमानी संघटनेने केली होती. स्थानिक पातळीवर या तक्रारीची दखल घेतल्या गेली नाही. त्यामुळे तक्रारकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केली. तेथे या तक्रारीची दखल घेऊन सीएमओ कार्यालयातील विशेष कार्यकारी अधिकारी आशा पठाण यांनी आरोग्य संचालकांना याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले. आरोग्य संचालकांनी अकोला मंडळाच्या उपसंचालकांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
शुभांगी अंबाडेकर यांचा राजीनामा
तक्रार झाल्यानंतर डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी २५ मे रोजी त्यांच्या नोकरीचा राजीनामा अकोला जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाकडे पाठविला आहे. सदर लेखी राजीनामा हा विहित नमुन्यात नसल्यामुळे तो अद्यापपर्यंत स्वीकारण्यात आला नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांनी सांगितले.
दोन सदस्यीय समिती गठित
या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य उपसंचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरी पवार व अतिरिक्त आरोग्य संचालक (कुष्ठरोग) डॉ. किशन राठोड यांचा समावेश असलेली दोन सदस्यीय समिती गठित केली आहे.
यवतमाळ हा जिल्हा अकोल्यापेक्षा खूप मोठा असून, येथे मी वगळता शस्त्रक्रिया करणारे दोनच नेत्रतज्ज्ञ होते. त्यामुळे तत्कालीन आरोग्य उपसंचालक डॉ. लव्हाळे यांनी मला येथे प्रतिनियुक्ती दिली. मी शासनाच्या आदेशाची कोणतीही पायमल्ली केली नसून, उच्च न्यायालयाच्या स्थगनादेशानुसार, खासगी वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयास अवगत केले असून, मी शासनाकडून व्यवसाय प्रतिरोध भत्ताही घेत नाही. फिरत्या पथकात असल्याने माझ्या कर्तव्याचा भाग म्हणून जिल्हा शल्यचिकित्सकांनी वेळोवेळी सांगितलेली कामे करणे हे माझे कर्तव्यच आहे. तक्रारकर्त्यांनी हेतुपुरस्सर ही तक्रार केली आहे.
- डॉ. शुभांगी अंबाडेकर, यवतमाळ.
याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार दोन सदस्यीय समिती गठित करण्यात आली असून, चौकशी अहवाल शासनाकडे पाठविण्यात येईल.
- डॉ. नितीन अंबाडेकर, उपसंचालक, आरोग्यसेवा,
अकोला मंडळ.