आदेश निघाला : शासकीय नाेकरीसाठी वयाेमर्यादेत दाेन वर्षांची शिथिलता
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 06:24 AM2023-03-04T06:24:52+5:302023-03-04T06:25:23+5:30
सध्या सरळसेवा भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी ३८ व मागास प्रवर्गासाठी ४३ वयोमर्यादा आहे. त्यात दोन वर्षांची शिथिलता देऊन ही वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ४० व मागास प्रवर्गासाठी ४५ अशी तात्पुरती वाढवण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्याच्या शासकीय नोकर भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची शिथिलता देण्याचा शासन निर्णय सरकारने शुक्रवारी जारी केला असून याचा लाभ मात्र ३१ मार्च २०२३ पर्यंत होणाऱ्या शासकीय नोकर भरतीसाठीच मिळणार आहे.
३ मार्च २०२२ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी ही शिथिलता दिली जाणार आहे.
सध्या सरळसेवा भरतीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी ३८ व मागास प्रवर्गासाठी ४३ वयोमर्यादा आहे. त्यात दोन वर्षांची शिथिलता देऊन ही वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ४० व मागास प्रवर्गासाठी ४५ अशी तात्पुरती वाढवण्यात आली आहे. वयोमर्यादेत शिथिलता देण्याचा हा निर्णय जारी होण्यापूर्वी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींसाठी जर अर्ज सादर करण्याची मुदत संपलेली नसेल तरीही उमेदवार या वयोमर्यादा वाढीचा लाभ घेत अर्ज करू शकतात.
‘लाेकमत’च्या वृत्तावर शिक्कामाेर्तब
शासकीय नाेकर भरतीसाठी वयाेमर्यादा वाढविण्यासंदर्भात ‘लाेकमत’ने गुरूवारी वृत्त प्रकाशित केले हाेते. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे ‘लाेकमत’च्या वृत्तावर शिक्कामाेर्तब झाले.