जळालेल्या मोटारीच्या बदल्यात नवी मोटार देण्याचे आदेश
By Admin | Published: January 16, 2015 05:32 AM2015-01-16T05:32:37+5:302015-01-16T05:32:37+5:30
खरेदी केल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत प्रवासात अचानक इंजिनाला आग लागून जळून भस्मसात झालेल्या अॅम्बेसेडर मोटारीच्या बदल्यात हिंदुस्तान मोटर्स या उत्पादक कंपनीने
मुंबई : खरेदी केल्यानंतर अवघ्या चार महिन्यांत प्रवासात अचानक इंजिनाला आग लागून जळून भस्मसात झालेल्या अॅम्बेसेडर मोटारीच्या बदल्यात हिंदुस्तान मोटर्स या उत्पादक कंपनीने महाराष्ट्र सरकारच्या पाटबंधारे विभागास नवी कोरी मोटार द्यावी किंवा नव्या मोटारीसाठी सव्याज पैसे द्यावेत, असा आदेश राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे.
धुळे जिल्हा ग्राहक मंच आणि महाराष्ट्र राज्य ग्राहक आयोगाने यापूर्वी असाच आदेश दिला होता. त्याविरुद्ध हिंदुस्तान मोटर्सने केलेले अपील फेटाळताना राष्ट्रीय आयोगाचे पीठासीन सदस्य जे. एम. मलिक आणि सदस्य एस. एम. कान्टीकर यांनी, मोटारीचे उत्पादनच मुळात सदोष होते, आस स्पष्ट निष्कर्ष नोंदवून हा निकाल दिला.
हिंदुस्तान मोटर्स कंपनीने पाटबंधारे विभागास तशीच नवी कोरी मोटार द्यावी किंवा आता त्यांनी तशा मोटारींचे उत्पादन बंद केले असेल तर नव्या मोटारीसाठी घटनेच्या दिवसापासून ९ टक्के व्याजासह पैसे द्यावेत, असे न्यायालयाने सांगितले. या आदेशाची अंमलबजावणी ४५ दिवसांत करायची आहे.
धुळे पाटबंधारे विभागाने १२ जून १९९८ रोजी औरंगाबाद येथील मे. कैलाश एजन्सीजकडून हिंदुस्तान मोटर्सच्या चार अॅम्बॅसॅडर मोटारी खरेदी केल्या होत्या. यानंतर चारच महिन्यांनी यातील एक मोटार घेऊन विभागाचे अधिकारी शिरपूर तालुक्यातील अभानपूर येथील एका पाझर तलावाच्या कामाची तपासणी करण्यासाठी निघाले होते. जेमतेम १४ किमी अंतर गेल्यावर मोटारीच्या इंजिनाने अचानक पेट घेतला व बघता बघता संपूर्ण मोटारीची जळून राख झाली.
सुदैवाने या दुर्घटनेतून विभागाचे अधिकारी सुखरूप बचावले होते. तत्कालिन कार्यकारी अभियंता अशोक नारायण पवार यांनी पाटबंधारे विभागाच्या वतीने ग्राहक न्यायालयात प्रकरण दाखल केले होते.
या सुनावणीत कंपनीसाठी अॅड. कपिल खेर यांनी तर पाटबंधारे विभागासाठी अॅड.प्रेषित सुरशे यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)