थंडी वाजू नये म्हणून विठ्ठलास रजई, मफलर तर रुक्मिणीमातेस शाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2019 12:34 PM2019-11-21T12:34:54+5:302019-11-21T12:38:12+5:30
पंढरपूर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचा निर्णय; वसंत पंचमीपर्यंत देवाच्या पोषाखात बदल
पंढरपूर : हिवाळा सुरू झाला आहे़ थंडीमुळे सावळा विठुराया आणि रुक्मिणीमातेला थंडी वाजू नये म्हणून रजई, शाल आणि मफलर असा पोषाख सुरू करण्यात आला आहे. कार्तिकी वारी झाल्यावर प्रक्षाळपूजेच्या दुसºया दिवसापासून श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेला हा पोषाख केला जातो. हा पोषाख वसंत पंचमी म्हणजेच फेब्रुवारी महिन्यापर्यंत ठेवला जातो, अशी माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली.
राज्यात यंदा पावसाने मुक्काम वाढवला. त्यामुळे थंडीही उशिराने पडण्यास सुरूवात झाली आहे. शेकडो वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरा जोपासणाºया वारकरी संप्रदायाचे आद्यस्थान असलेल्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेच्या पोषाखात बदल केला आहे.
देवाला थंडी वाजू नये म्हणून काकडा आरती झाल्यावर रजई आणि कानपट्टी बांधली जाते तर रुक्मिणीमातेला उबदार शाल पांघरली जाते. जेणेकरून थंडी वाजू नये अशी भावना आहे. याबरोबर देवाला पारंपरिक दागिनेदेखील परिधान केले जातात. पुढे उन्हाळ्यात देवाला पांढरे वस्त्र परिधान केले जाते. असे असले तरी सध्या रजई, मफलर आणि शाल केलेल्या पोषाखात सावळ्या विठुरायाचे लोभस रूप अधिकच खुलून दिसून येत आहे.