आॅर्डर... आॅर्डर...आॅर्डर! तरुणांची ‘गांधीगिरी’ सुरू
By Admin | Published: January 11, 2016 01:55 AM2016-01-11T01:55:56+5:302016-01-11T15:11:23+5:30
अंकित जाधव हा बारावीतील तरुण, सुहास ठाकूर बी. कॉमचा विद्यार्थी, मिलिंद मोरे हा चांगल्या कंपनीत नोकरी करणारा युवक आणि अमित अडखळे हा बी.ए.चा विद्यार्थी हातात झाडू
ठाणे : अंकित जाधव हा बारावीतील तरुण, सुहास ठाकूर बी. कॉमचा विद्यार्थी, मिलिंद मोरे हा चांगल्या कंपनीत नोकरी करणारा युवक आणि अमित अडखळे हा बी.ए.चा विद्यार्थी हातात झाडू घेऊन टेकडी बंगला परिसरात साफसफाई करीत आहेत... त्यांच्या मित्र परिवारातील मंडळी खालमानेने ही गांधीगिरी पाहत आहेत... नौपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस या तरुणांच्या सफाईवर लक्ष ठेवून आहेत... आणि शेकडो बघे येताजाता या घटनेची चौकशी करीत आहेत, हे दृश्य रविवारी येथे दिसले.
दसरा मिरवणुकीत मद्यधुंद अवस्थेत सहभागी झालेल्या या तरुणांवर गतवर्षी आॅक्टोबर महिन्यात एका महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या तरुणांनी तक्रारदार महिलेशी सामंजस्याने हा वाद सोडवला. मात्र, हा गुन्हा रद्द करवून घेण्याकरिता त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला, तेव्हा न्यायालयाने गुन्हा जरी रद्द केला तरी पुन्हा असा प्रकार त्यांच्या हातून घडू नये व अन्य तरुणांनाही धडा मिळावा, याकरिता या चौघांना पुढील सहा महिने दर रविवारी सकाळी व सायंकाळी प्रत्येकी चार तास रस्त्यावर साफसफाई करण्याची हटके शिक्षा ठोठावली.
न्यायालयाचा निकाल गुरुवार, ७ जानेवारीला आल्यानंतर हा पहिलाच रविवार. त्यामुळे जाधव, ठाकूर, मोरे व अडखळे हे तरुण हातात झाडू घेऊन रस्त्यावर साफसफाई करीत होते. त्यांची मित्र मंडळी न्यायालयाच्या आदेशावरून करावी लागलेली गांधीगिरी पाहत होते. नौपाडा पोलीस ठाण्याचे या प्रकरणातील तपास अधिकारी लोंढे आणि एक हवालदार आदेशाची अंमलबजावणी होत आहे की नाही, हे पाहत मागोमाग चालत होते. त्यांची छायाचित्रे काढणाऱ्यांना ते आणि त्यांचे मित्र छायाचित्रे न काढण्यासाठी विनवत होते.