जनऔषधी दुकानांचा स्थगिती आदेश फिरविला; चुकीचा देखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 01:48 AM2018-03-25T01:48:26+5:302018-03-25T01:48:26+5:30
राज्यातील २३ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील जनऔषधी दुकाने उघडण्यासंबंधी शर्ती-अटींबाबत मोठ्या प्रमाणात आक्षेप आल्याने संचालकांनी प्रक्रियेला स्थगिती दिली होती, परंतु राजकीय व प्रशासकीय दबावानंतर चौथ्याच दिवशी तांत्रिक चुकांची कारणे पुढे करीत स्थगिती उठविण्यात आली.
मुंबई : राज्यातील २३ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांतील जनऔषधी दुकाने उघडण्यासंबंधी शर्ती-अटींबाबत मोठ्या प्रमाणात आक्षेप आल्याने संचालकांनी प्रक्रियेला स्थगिती दिली होती, परंतु राजकीय व प्रशासकीय दबावानंतर चौथ्याच दिवशी तांत्रिक चुकांची कारणे पुढे करीत स्थगिती उठविण्यात आली.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयातर्फे सर्व २३ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत स्वस्त दरांतील जेनेरिक औषधांची दुकाने उघडली जाणार आहेत. मुंबईच्या मर्जीतील तीनच संस्थांना ही दुकाने देता यावी, असा प्रयत्न होता. ते कंत्राट इतरांना मिळू नये, यासाठी चौथ्या वेळेत दोन जाचक अटी घालण्यात आल्या. या दोन अटींवर तीव्र आक्षेप घेत, त्या वगळण्याची मागणी सर्वच अर्जदारांनी केली, शिवाय काही सूचनाही सांगितल्या. अर्जदारांचा वाढता रोष व मागणी लक्षात घेता, वैद्यकीय शिक्षण संचालकांनी १६ मार्चला स्थगितीचा आदेश जारी केला.
आक्षेपाबाबत सरकारचा सल्ला मिळेपर्यंत सदर प्रक्रिया आहे, तेथेच थांबविण्याचा उल्लेख आदेशात आहे, परंतु त्यानंतर जळगावातून अचानक राजकीय चक्रे फिरल्याने २० मार्चला संचालकांनी पुन्हा पत्र जारी केले. त्यात टायपिंगच्या चुकीमुळे प्रक्रिया थांबविण्याचा उल्लेख झाल्याचे म्हटले आहे. टायपिंगची चूक लक्षात यायला चार दिवस का लागले, हा मुद्दा उपस्थित केला जात आहे.